नागपूर : शहरात पुन्हा करोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे महापालिकेचा आरोग्य विभाग सक्रिय झाला आहे. बंद करण्यात आलेले चाचणी केंद्र पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. करोनाची वाढती संख्या आणि पुढील धोका टाळण्यासाठी नागरिकांनी थोडेही लक्षणे आढळल्यास आपल्याजवळील चाचणी केंद्रात जाऊन नि:शुल्क चाचणी करावी, असे आवाहन महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले.
करोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पुन्हा एकदा महापालिकेचा आरोग्य विभाग आणि प्रशासन सज्ज झाले आहे. विविध भागांमध्ये सध्या ३६ केंद्रांवर करोना चाचणी केली जात आहे. बाहेरून प्रवास करून येत असलेल्या नागरिकांना करोनाची लागण होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या नागरिकांना चाचणी करावी, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. सध्या शहरात ९९ टक्केपेक्षा जास्त नागरिकांनी करोना प्रतिबंधात्मक लसीची पहिली मात्रा आणि ७९ टक्के नागरिकांनी दुसरी मात्रा घेतली आहे. जे नागरिक दुसऱ्या मात्रेसाठी पात्र आहेत पण अजूनही मात्रा घेतलेली नाही त्यांनी लवकरात लवकर दुसरी मात्रा घेऊन लसीकरण पूर्ण करून घ्यावे असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
दुसऱ्या लसमात्रेकडे दुर्लक्षच
शहरात १८ वर्षांवरील वयोगटात १०४ टक्के नागरिकांनी पहिली मात्रा घेतली असून ८४ टक्के नागरिकांनी दुसरी मात्रा घेतली आहे. तसेच १५ ते १७ वर्ष वयोगटातील ६६ टक्के पात्र व्यक्तींनी पहिली मात्रा घेतली असून ५० टक्के लोकांनी दुसरी मात्रा तर १२ ते १४ वर्षे वयोगटामध्ये ३९ टक्के मुलांनी पहिली आणि १६ टक्के मुलांनी दुसरी मात्रा, तसेच १८ ते ५९ वयोगातील ५१०८ नागरिकांनी वर्धक मात्रा घेतली आहे. शहरात लसीकरणासाठी पात्र लाभार्थ्यांची संख्या २१,८९,०२५ असून पहिली मात्रा २१,७१,३९६ नागरिकांनी आणि १७,३२,४५४ नागरिकांनी दुसरी मात्रा घेतली आहे.
पुन्हा नऊ करोनाग्रस्तांची भर
मागच्या २४ तासांत जिल्ह्यात ९ करोनाग्रस्त आढळले. चाचण्यांच्या तुलनेत सकारात्मक अहवालाचे प्रमाण २.१५ टक्के नोंदवले गेले. जिल्ह्यात १ मे रोजी ३६९ संशयितांची करोना चाचणी झाली. यापैकी ९ नागरिकांना करोना असल्याचे निदान झाले. आज गुरुवारी जिल्ह्यात ४१८ चाचण्या झाल्या. त्यात २.१५ टक्के म्हणजे ९ जणांना करोना असल्याचे स्पष्ट झाले. नवीन रुग्णांत शहरातील ७, ग्रामीणच्या २ रुग्णांचा समावेश आहे. सध्या शहरातील उपचाराधीन करोनाग्रस्तांची संख्या १४, ग्रामीण २३, जिल्ह्याबाहेरील १ अशी एकूण ३८ रुग्णांवर पोहचली आहे. दरम्यान, शहरात दिवसभरात २, ग्रामीणला १ असे एकूण ३ व्यक्ती करोनामुक्त झाले. करोनामुक्तांचे प्रमाण ९८.२१ टक्के आहे.