अकोला: मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळ विभागीय व्यवस्थापकपदी प्रथमच महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय रेल्वे वाहतूक सेवा १९९८ बॅचच्या अधिकारी इति पांडे यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. रेल्वेच्या विविध विभागांसह मॅरेथॉन स्पर्धेमध्ये त्यांनी चमकदार कामगिरी केली आहे.
२०२२-२३ मध्ये रेल्वे मंडळाने मध्य रेल्वेला ‘नॉन-फेअर’ कमाईसाठी ८२ कोटींचे लक्ष्य दिले होते. इति पांडे यांच्या नेतृत्वाखाली मध्य रेल्वेने ८७ कोटींची कमाई केली. याच कालावधीत तिकीट तपासणीच्या कमाईसाठी दिलेले लक्ष्य २३५.३० कोटी होते. उत्तम नियोजनामुळे मध्य रेल्वेने ३०३.९१ कोटींची कमाई केली. ४६.९५ लाख विना तिकीट प्रवाशांना दंड करण्यात आला.
हेही वाचा… VIDEO: इकडे मान्सूनचा वेग वाढला… आणि पक्ष्यांची वीण घट्ट होऊ लागली
तिकीट तपासणी कमाईमध्ये भारतीय रेल्वेच्या १६ झोनमध्ये मध्य रेल्वे प्रथम क्रमांकावर आहे. इति पांडे यांचा विविध पदांवर कार्य करण्याचा दीर्घ अनुभव आहे. भुसावल मंडळ रेल्वेच्या व्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी इति पांडे मुख्य वाणिज्य व्यवस्थापक यात्री सेवा मुख्यालय येथे कार्यरत होत्या. त्यांनी गत महिन्यात दक्षिण आफ्रिकेत मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेऊन ८८ कि.मी.चे अंतर ११ तास ४७ मिनिटात पूर्ण करून विजेतेपद पटकावले आहे.