लोकसत्ता टीम

नागपूर : लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना आणि प्रचार शिगेला पोहचला असताना राज्यात अवकाळी पावसाचा जोर वाढला आहे. राज्यात आणि प्रामुख्याने विदर्भात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, येत्या २४ तासात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस हजेरी लावणार असल्याचे भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे.

संपूर्ण आठवडा वादळीवारा आणि गारपिटीसह राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर आठवड्याची अखेरसुद्धा मुसळधार पावसानेच होणार आहे. विदर्भात आज नागपूरसह अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा ‘अलर्ट’ दिला आहे. तर सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांना सुद्धा ‘अलर्ट’ दिला आहे. गेल्या आठवड्याभरापासूनच कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाले आहे. तर विदर्भातला शेतकरी संकटात सापडला आहे.

आणखी वाचा-“राहुल गांधींवर जनतेचा विश्वास नाही,” अनुराग ठाकूर यांची टीका; म्हणाले, “काँग्रेसमध्ये…”

मराठवाड्यातील लातूर आणि परभणीत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर विदर्भातील अनेक जिल्ह्यात वादळीवारा आणि गारपिटीसह पाऊस झाल्याने शेतपिकांचे तसेच घरांचे नुकसान झाले. राज्यात लोकसभा निवडणूकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक मात्र अवकाळी पावसामुळे त्रस्त झाले आहेत. प्रामुख्याने विदर्भात अवकाळीचे संकट कोसळले आहे. तर भारतीय हवामान खात्याने आठवड्याची अखेरही पावसानेच होणार असल्याचे सांगितले आहे. खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस येण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’ घोषित केला आहे.