जनहित याचिका दाखल करून घेतली
हेल्मेट सक्तीनंतर शहरात सुरू असलेला हेल्मेटचा काळाबाजार आणि रस्त्यांवर विकण्यात येत असलेल्या आयएसआय क्रमांकाच्या हेल्मेटच्या धक्कादायक प्रकाराची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात तक्रार करणाऱ्या अखिल भारतीय ग्राहक पंचायत-विदर्भ प्रदेशच्या पत्रावर जनहित याचिका दाखल करून घेतली.
शहरात हेल्मेट सक्ती लागू केल्यानंतर वाहनचालकांची हेल्मेटच्या दुकानावर गर्दी वाढली आहे. यामुळे हेल्मेटचा काळाबाजार वाढला असून बनावट आयएसआय क्रमांकासोबत बाजारभावापेक्षा अधिक पैसे घेऊन हेल्मेटची धडाक्यात विक्री सुरू आहे. काही दिवसांपूर्वी प्रशासनाने हेल्मेटचे मनमानी दर आणि काळाबाजार यावर अंकुश लावण्याचे संकेत दिले होते, परंतु आतापर्यंत त्यावर काहीच कारवाई करण्यात आली नसल्यामुळे आयएसआय मार्कच्या बनावट हेल्मेटच्या दुकानावर ग्राहकांची गर्दी वाढत आहे. हेल्मेटची गुणवत्ता आणि किंमत यासाठी जबाबदार विभाग एकमेकांकडे बोट दाखवत आहेत.
शासनाची तिजोरी भरण्यासाठी रस्ते कर वसूल करण्यात येते, परंतु त्या मोबदल्यात नागरिकांना सुविधा मिळत नाहीत. शहराच्या अनेक रस्त्यांवर खड्डे पडले असून अनेक ठिकाणी गिट्टी
उखडलेली आहे. दोन्ही कारणांमुळे वाहनचालक रस्त्यावर पडू शकतो. पडल्यानंतर हेल्मेटमुळे वाहनचालकाला दुखापत होत नाही. त्याचा जीव वाचतो. मात्र हेल्मेट तुटते. बनावट आयएसआय क्रमांकाचे आणि रस्त्यांवर विकण्यात येणारे हेल्मेट निकृष्ट दर्जा असल्याने अपघातामध्ये त्यांचा चक्काचूर होऊन वाहनचालकाचा मृत्यू होण्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे हेल्मेट सक्ती लागू करण्यापूर्वी शहरातील रस्त्याची स्थिती सुधारण्यात यावी. तसेच शहरात दहा लाख दुचाकी परवानाधारक असल्याने किमान २० लाख आयएसआय हेल्मेट शहरात असावेत.
त्यानंतर हेल्मेटचा काळाबाजार होणार नाही, असे पत्र अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने उच्च न्यायालयाला लिहिण्यात आले. या पत्राची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेऊन जनहित याचिका दाखल करून घेतली. न्या. भूषण गवई आणि न्या. स्वप्ना जोशी यांनी आज अ‍ॅड. मोहित खजांची यांची न्यायालयीन मित्र म्हणून नेमणूक केली आणि दोन आठवडय़ात याचिका तयार करून दाखल करण्याचे निर्देश दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: High court take serious note on black marketing of helmets