नागपूर : मध्यप्रदेशातील सिवनीजवळ अलीकडेच रानडुकराचा पाठलाग करताना रानडुक्कर आणि वाघीण विहिरीत पडले. सावज समोरच असल्याने वाघीण त्याला सहज भक्ष्य बनवू शकली असती, पण दोघेही जीव वाचवण्यासाठी धडपडत होते. त्याच घटनेची पुनरावृत्ती नागपूर जिल्ह्यात देखील घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सावजाचा पाठलाग करताना वाघ विहिरीत पडला आणि जीव वाचवण्यासाठी धडपड करू लागला. वनखात्यानेही प्रयत्नांची शर्थ करत त्या वाघाला सुखरूप बाहेर काढले. मात्र, वाघाला या घटनेचा एवढा धक्का बसला की बाहेर काढल्यानंतर त्यावर लगेच उपचार करणे अशक्य झाले.

सावनेर तालुक्यातील सिरोंजीमधील शेत शिवारातील विहीरीत पडलेल्या वाघाला यशस्वीरित्या बाहेर काढण्यात यश आले. सोमवारी दुपारी हा वाघ विहीरीत पडल्याची माहिती खापा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी एस.जी. आठवले यांना मिळाली. रात्री उशिरा या वाघाला बाहेर काढण्यात यश आले.

मौजा सिरोंजी येथील गोवर्धन राऊत यांच्या शेतातील विहीरीत वाघ पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी वनखात्याला याची माहिती दिली. या माहितीनंतर बचाव पथकाचे नियोजन करण्यात आले. प्रथम सिरोंजी गावातून खाट आणली. त्या खाटेवर वाघाने उडी घेतली.

यानंतर सेमिनरी हिल्सवरील ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राची चमू, खापा पोलीस ठाण्याची चमू व पेंच व्याघ्रप्रकल्पाच्या नागलवाडी वनपरिक्षेत्राची चमू त्याठिकाणी पोहोचली. त्यांनी विहिरीत पिंजरा सोडला आणि वाघाला यशस्वीरित्या पिंजऱ्यात टाकून बाहेर काढण्यात आले.

या वाघाला ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्रात आरोग्य तपासणीसाठी आणण्यात आले. ही कार्यवाही उपवनसंरक्षक डॉ. प्रभूनाथ शुक्ल व सहाय्यक वनसंरक्षक विजय गंगावणे यांच्या मार्गदर्शनात वनपाल सतीश गडलिंगे, संजय भेंडाळे तसेच ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्रातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राहूल फुलसुंगे तसेच कर्मचारी एस.आर. शेलार, के.डी. कुकलारे, एस.एस. चोपडे, जी.वाय, डाखोरे, एन.पी. चंदकापुरे, पी.जे. भंडारे, वनरक्षक राठोड यांनी पार पाडली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur sironji well tiger saoner taluka rgc 76 ssb