न्या. बोबडे विधि महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी; दीक्षांत सोहळयाला प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रण 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

९६ वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्यारूपाने देशाला सत्तेचाळीसावे सरन्यायाधीश दिले आहेत. १९६८ मध्ये माजी उपराष्ट्रपती व न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्ला यांच्यारूपाने हा मान पहिल्यांदा नागपूर विद्यापीठाला मिळाला होता हे येथे उल्लेखनिय.

१९२३ मध्ये स्थापन झालेल्या नागपूर विद्यापीठाला मोठा गौरवशाली इतिहास आहे. भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत पी. व्ही. नरसिंहराव, ज्ञानयोगी दिवंगत श्रीकांत जिचकार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अशा अनेक रत्नांनी नागपूर विद्यापीठाच्या खाणीतून जन्म घेतला. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नियुक्तीने नागपूर विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तूरा रोवला गेला आहे. न्यायमूर्ती शरद बोबडे यांना घरातूनच वकिली व्यवसायाचे बाळकडू मिळाले. त्यांनी सत्तरच्या दशकामध्ये आपले महाविद्यालयीन शिक्षण शहरातील सेन्ट फ्रान्सीस दी सेल्स हायस्कूलमधून पूर्ण केले. त्यानंतर नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातून १९७८ मध्ये विधीशाखेची पदवी घेतली. ४७वे सरन्यायाधीश म्हणून ते १८ नोव्हेंबरला शपथ घेणार आहेत. विद्यापीठासाठी ही फार भूषणावह बाब असल्याने डिसेंबर महिन्यात होऊ घातलेल्या १०७ व्या दीक्षांत सोहळयाला न्यायमूर्ती बोबडे यांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात येणार आहे. एवढय़ा मोठय़ा पदावर पोहोचल्यावर नागपूर विद्यापीठालाही आपल्या माजी विद्यार्थ्यांचा अभिमान वाटतआहे. देशाच्या सरन्यायाधीशांना आमंत्रित करून हा सोहळा भव्यदिव्य करण्याचा विद्यापीठ प्रशासनाचा मानस आहे.

न्यायमूर्ती शरद बोबडे हे विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असल्याने त्यांच्या विशेष उपस्थितीत दीक्षांत सोहळा हा नक्कीच ऐतिहासिक ठरेल. विद्यापीठासाठी ही भूषणावह बाब असून त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

– डॉ. सिद्धार्थविनायक काणे, कुलगुरू.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur university conferred on the nations 47th chief justice abn