नागपूर : आपल्या देशावर झालेल्या लागोपाठच्या आक्रमणांमुळे समाजावर मानसिक दडपण आहे. त्यामुळे स्पष्ट विचार करणे, स्पष्ट बोलणे याचे साहस, आत्मविश्वास दिसत नाही. परिणामी, स्वार्थ आणि भेदाचे वातावरण आहे. म्हणून आपल्याला जोडणाऱ्या सूत्राच्या आधारावर सर्व समाज संघटित करायचा आहे. आपण कोण हे कळले तर आपले कोण हे कळते. त्यामुळे आपण हिंदू आहोत हे अभिमानाने आणि गौरवाने म्हणा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-हिंदू राष्ट्राच्या जीवनोद्देशाची क्रमबद्ध अभिव्यक्ती’ या साप्ताहिक विवेकच्या ग्रंथाचे प्रकाशन गुरुवारी सरसंघचालकांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. रेशीमबाग येथील महर्षी व्यास सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूट, पुणेचे संस्थापक प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर आणि नागपूर महानगर संघचालक राजेश लोया उपस्थित होते. डॉ. भागवत पुढे म्हणाले, ‘‘देशात हजारो वर्षांत अनेक महापुरुष, त्यागी झाले. मात्र मूळ फळ हाती लागले नाही. परकीय आक्रमण झाले की ते आपण परतवून लावत गेलो. वारंवार कुणीतरी येतो आणि पाहता पाहता गुलाम करून जातो. आपण गुलाम बनतो आणि स्वातंत्र्य मिळवतो. दरवेळी कुणीतरी घरभेदी बनतो. आपल्यातील भेद हे परकीयांच्या यशाला खतपाणी घालतात. मुळात हा रोग आहे. त्याचे निदान झाल्याशिवाय या देशाचे नष्टचर्य संपणार नाही. अशा सर्व प्रकाराच्या परिस्थितीतून जगाचे आणि राष्ट्राचे जीवन नीट चालावे यासाठी हिंदू धर्म आहे. ज्ञान, विद्वान, ग्रंथ खूप आहेत. मात्र, हिंदू धर्माचे आचरण होत नाही. त्यामुळे सर्वांनी हिंदू जीवनपद्धती शिकायला हवी.’’

हेही वाचा >>> Lok Sabha Election 2024 Phase 1 : विदर्भात ५ जागांसाठी आज मतदान; नक्षलग्रस्त, संवेदनशील भागांत चोख सुरक्षा व्यवस्था

संघ स्थापनेनंतर कौतुकाचा एकही शब्द कानावर पडला नाही. जनावरांच्या पायाखाली तुडवत आम्ही वाढत राहिलो. परिस्थितीचे उतारचढाव कसेही असले तरी त्याला तोंड देत समोर जाणारा कायम असतो. परिस्थिती कितीही बदलली तरी रस्त्यावरून पाय ढळायला नको याचे भान ठेवावे, असे आवाहन डॉ. भागवत यांनी केले.

संघ साधनेवर नाही तर हिंदू धर्माच्या आचरणावर चालतो. एका संस्थेच्या अहंकाराचे पोषण करण्यासाठी संघ नाही. त्यामुळे शताब्दी साजरी करण्याचा विचार नाही. समाजाचा पराक्रम त्याच्या शीलाच्या बळावर ओळखला जायला हवा, केवळ शक्तीच्या बळावर नाही. या समाजाचा विजय हा कधीही आसुरी किंवा धनविजय नव्हे धर्मविजय असेल. – डॉ. मोहन भागवत, सरसंघचालक