अमरावती : जिल्‍ह्यातील दर्यापूर तालुक्‍यातील उपराई येथील सरपंचाला बेदम मारहाण करण्‍यात आल्‍याची धक्‍कादायक घटना उघडकीस आली आहे.ग्रामपंचायतीच्‍या घरकुलांच्‍या यादीमध्‍ये नाव न आल्‍याच्‍या कारणावरून काही लोकांनी सरपंचावर हल्‍ला केला. जखमी सरपंचावर येथील रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत. उपराई येथील सरपंच नीरज नागे हे मंगळवारी रात्री घरी जेवण केल्‍यानंतर मित्रांसमवेत बाहेर जात असताना अचानक काही लोकांनी त्‍यांच्‍यावर हल्‍ला केला. त्‍यांना दर्यापूर येथील उपजिल्‍हा रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मात्र, प्रकृती गंभीर असल्‍याने त्‍यांना अमरावती येथील रुग्‍णालयात हलविण्‍यात आले. या घटनेमुळे गावात रोष व्‍यक्‍त केला जात असून हल्‍लेखोरांवर तत्‍काळ कारवाई करण्‍याची मागणी करण्‍यात आली आहे.मी सरपंच झाल्‍यानंतर गावातील काही मुस्‍लीम समुदायातील लोक मला भयंकर त्रास देत होते. गेल्‍या चार दिवसांमध्‍ये घरकुलांच्‍या यादीत त्‍यांचे नाव न आल्‍याने त्‍यांनी मला ठार मारण्‍याची धमकी दिली होती.

मी या प्रकरणी पोलीस ठाण्‍यात तक्रार देखील दिली होती. माझ्या जिवाला धोका असल्‍याचे मी तक्रारीत नमूद केले होते. मला सुरक्षा पुरविण्‍यात यावी, अशी मागणीही मी केली होती. दरम्‍यान मी काल जेवण केल्‍यानंतर मित्रांसोबत मी जात असताना काही लोकांनी मागून माझ्यावर हल्‍ला केला. दगड आणि पाईपने मला मारहाण करण्‍यात आली. मी त्‍यांच्‍या तावडीतून सुटका करण्‍याचा प्रयत्‍न केला आणि जवळच्‍या झुडूपांमध्‍ये जाऊन लपलो. माझ्या मित्रांनी मला रुग्‍णालयात आणले, असे नीरज नागे यांनी सांगितले.

मी सरपंच झाल्‍यापासून काही लोक माझ्यावर राग ठेवून आहेत. मी शिवसैनिक आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र लावल्‍यामुळे काही ग्राम पंचायत सदस्‍यांनी मला विरोध केला होता, असेही नीरज नागे यांचे म्‍हणणे आहे. काही लोकांनी माझ्याविषयी द्वेषभावना ठेवून त्रास देण्‍यास सुरूवात केली होती. आपण आजवर संयम बाळगला, पण काही लोकांनी आपल्‍यावर हल्‍ला केला, असेही नीरज नागे यांनी सांगितले.

गेल्‍या डिसेंबर महिन्‍यात बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने सर्वत्र खळबळ उडाली असताना दर्यापूर तालुक्‍यात ही घटना उघडकीस आल्‍याने गावामध्‍ये रोष व्‍यक्‍त केला जात आहे. या प्रकरणाची चौकशी करून हल्‍लेखोरांना तत्‍काळ अटक करण्‍यात यावी, अशी मागणी गावातील लोकांनी केली आहे. नीरज नागे यांची प्रकृती स्थिर असल्‍याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sarpanch was brutally beaten in uprai daryapur taluka amravati district mma 73 sud 02