लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : सावज अंतिम टप्प्यात येऊनही कित्येकदा वाघाचे प्रयत्न अपुरे पडतात आणि मग त्याला शिकारीवर पाणी सोडावे लागते. म्हणूनच जेव्हा त्याची शिकार साध्य होते, तेव्हा ती तो लपवून ठेवतो. दोन ते तीन दिवस वाघ त्या शिकारीवर ताव मारतो. वाघाला शिकार करुन त्यावर ताव मारताना पर्यटक अनेकदा पाहतात, पण लपवून ठेवलेल्या शिकारीवर ताव मारताना पाहणे फार दूर्मिळ. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफरक्षेत्रात ‘छोटा मटका’ हा वाघ आणि ‘बबली’ या वाघिणीचा बछडा लपवून ठेवलेल्या शिकारीवर ताव मारतानाचे दृश्य धनंजय खेडकर यांनी कॅमेऱ्यात टिपले.

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात आता पर्यटकांची गर्दी वाढली आहे. उन्हाळा असल्यामुळे सफारीची नोंदणी पूर्ण झाली आहे. यापूर्वी केवळ गाभा क्षेत्राकडे पर्यटकांचा ओढा असायचा, पण आता बफर क्षेत्रातही वाघ सहजपणे दर्शन देत असल्याने गाभा क्षेत्रासोबतच बफर क्षेत्रालाही पर्यटकांची पसंती लाभत आहे. बफर क्षेत्रात वाघांच्या वेगवेगळ्या करामती पर्यटकांना पाहायला मिळत आहेत. वाघाची विशेषत: म्हणजे एकदा केलेली शिकार तो किमान तीन दिवस तरी पुरवतो. त्या शिकारीवर अस्वल, तरस आणि विशेषकरुन गिधाडे आदी प्राण्यांनी ताव मारु नये म्हणून शिकार लपवून ठेवतो. त्यासाठी गुहा किंवा दाट झाडांची दाट जाळी निवडतो. वाघ हा अतिउच्च दर्जाचा शिकारी असला तरी वाघाला एक शिकार मिळवायला सरासरी २०वेळा तरी प्रयत्न करावे लागतात. त्यानंतरच शिकार साध्य होते.

आणखी वाचा-मस्तच! हत्तीने स्वत: हापशी हापसून माहूताला पाजले पाणी… व्हिडीओ एकदा बघाच…

ताडोबात ‘मटका’ या वाघाने आधी साम्राज्य गाजवले, पण त्याचा वारसदार म्हणजेच ‘छोटा मटका’ त्यापेक्षाही करामती निघाला. आता तर या छोट्या मटक्याचे तिन्ही बछडे हाच वारसा पुढे चालवत आहेत. वयाची दोन वर्षे पूर्ण होत असताना वाघ शिकार करायला शिकतो. मात्र, हे बछडे कमी वयातच शिकारीचा प्रयत्न करायला लागले आहेत. ‘छोटा मटका’ हा वाघ आणि ‘बबली’ या वाघिणीचा हा बछडा लवकरच शिकार करायला शिकला आणि शिकार केल्यानंतर ती लपवण्याचे कौशल्य देखील तो शिकला. नवेगाव बफर क्षेत्रात ही लपवलेली शिकार खातानाचे दृश्य छायाचित्रकार धनंजय खेडकर यांनी टिपले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of tiger eating hidden prey in navegaon buffer area rgc 76 mrj