यवतमाळ : राज्यात शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातही दोन गट पडले. बहुतांश जुने निष्ठावंत शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूने उभे राहिले. मात्र पक्ष अडचणीत असताना साथ देणाऱ्या अनेक निष्ठावान शिवसैनिकांना बाजूला सारत शिवसेना (उबाठा) पक्षात निवडणुकीच्या तोंडावर मोठे संघटनात्मक फेरबदल करण्यात आल्याने कुरबुरी सुरू झाल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेनेतील संघटनात्मक फेरबदल हे थेट पक्षाच्या मुखपत्रातून जाहीर होतात. २७ फेब्रुवारीला यासंदर्भात वृत्त प्रकाशित झाल्यानंतर ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही उठाठेव कोणाच्या सल्ल्याने करण्यात आली, हा प्रश्न निष्ठावान शिवसैनिकांना पडला आहे. यवतमाळ जिल्हा हा अलिकडच्या काळात शिवसेनेचा बालेकिल्ला झाला होता. एक आमदार, एक खासदार, एक विधान परिषद सदस्य, जिल्हा परिषदेसह, काही नगरपरिषदा, नगर पंचायतींवर शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व होते. मात्र २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडून शिवसेना शिंदे गट अस्तित्वात आला. त्यावेळी येथील आमदार संजय राठोड, खासदार भावना गवळी यांच्यासह काही पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात दाखल झाले. मात्र शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळापासून पक्षात असलेले अनेक निष्ठावान शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूने राहिले.

हेही वाचा – बुलढाण्यात महायुतीत महाफूट, भाजप लोकसभा प्रमुखांचे बंड; उमेदवारी अर्ज दाखल

बदललेल्या राजकीय समीकरणानंतर जिल्ह्यातील काही नेते इतर पक्षातून शिवसेनेत दाखल झाले. त्यात माजी मंत्री संजय देशमुख हे अग्रक्रमावर आहे. संजय देशमुख हे मूळचे शिवसैनिक आहेत. शिवसेना (उबाठा) मध्ये दाखल झाल्यानंतर संजय देशमुख यांनी पक्षाची धुरा हाती घेतली. संतोष ढवळे, विश्वास नांदेकर, प्रवीण शिंदे हे पूर्वीपासूनच जिल्हा प्रमुख म्हणून काम पाहत होते. पक्षाची वाटचाल सुरळीत सुरू असताना, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर २७ फेब्रुवारी रोजी पक्ष प्रमुखांनी संघटनात्मक पातळीवर बदल केल्याची माहिती, अनेकांना मुखपत्रातून मिळाली आणि निष्ठेचे हेच फळ का, असा प्रश्न जो तो एकमेकांना विचारू लागला.

माजी आमदार विश्वास नांदेकर, संतोष ढवळे हे पदाधिकारी शिवसेनेतील मुलुख मैदान तोफ आहेत. नवीन संघटनात्मक बदलात त्यांचेसुद्धा खच्चीकरण करण्यात आल्याची खंत अनेक शिवसैनिक खसगीत बोलून दाखवतात. अनेक नवख्यांना पक्षात संघटनात्मक पदावर जबाबदारी सोपविण्यात आली. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर याचा फटका शिवसेना (उबाठा)च्या उमेदवारास बसण्याची भीती पक्षात व्यक्त होत आहे.

हेही वाचा – ‘एमपीएससी’च्या मुलाखतीत गुण वाढवून देण्यासाठी ‘निनावी’ फोन, पडद्यामागे कोण…

पूर्वीचे जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांना यापूर्वीच बढती देवून जिल्हा संपर्क प्रमुख करण्यात आले आहे. जिल्ह्यात पूर्वीप्रमाणेच तीन जिल्हाप्रमुख ठेवण्यात आले आहेत. विश्वास नांदेकर यांच्याकडे जिल्हाप्रमुख म्हणून केवळ वणी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी आहे. संतोष ढवळे यांना यवतमाळ व पुसद विधानसभा क्षेत्र जिल्हाप्रमुख पदावरून बाजूला करत त्यांना यवतमाळ विधानसभा प्रमुख करण्यात आले. नव्याने किशोर इंगळे यांच्यावर यवतमाळ व राळेगाव विधानसभा जिल्हाप्रमुखाची जबाबदारी सोपविण्यात आली. प्रवीण शिंदे यांच्याकडे केळापूर, दिग्रस, उमरखेड व पुसद अशा चार विधानसभा मतदासंघाच्या जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली. जिल्हाप्रमुख पदाखालील सर्व पदांवरील जुन्या पदाधिकाऱ्यांना बाजूला करून नवीन पदाधिकारी नेमण्यात आले. यातील अनेक पदाधिकारी अतिशयच नवखे असल्याने पक्ष तळागळापर्यंत कसा पोहोचेल, अशी चर्चा पक्षात आहे.

शिवसेना उबाठाकडून संजय देशमुख हे स्वत: लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अशावेळी जुन्या जाणत्या शिवसैनिकांना सोबत ठेवून वाटचाल करणे अपेक्षित असताना, नव्या बदलांना सोबत घेवून निवडणुकीला सामोरे जाणे, हे पक्षातील अनेक निष्ठावानांसाठी काळजीचे कारण ठरत आहे.

हेही वाचा – इपीएस-९५ पेन्शनधारक भाजपवर नाराज, म्हणाले, “विरोधात…”

निवडणुकीत फटका बसू नये म्हणून बदल

या संदर्भात शिवसेना उबाठाचे जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड यांना विचारले असता, पक्षात संघटनात्मक बदल करणे आवश्यक होते. काही नियुक्त्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होत्या. निवडणुकीच्या तोंडावर या बदलांचा कोणताही परिणाम पक्षावर होणार नाही. उलट, निवडणुकीत फटका बसू नये म्हणून काही ठिकाणी बदल करणे आवश्यकच होते, अशी प्रतिक्रिया राजेंद्र गायकवाड यांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yavatmal organizational changes in shivsena thackeray faction ahead of elections by removing the experienced and old shivsainiks there is an opportunity for new workers nrp 78 ssb