नाशिक: जिल्ह्यातील आदिवासी भागात आणि दुष्काळी तालुक्यांमध्ये टंचाईच्या स्थितीत लोकसहभागातून पाणी साठवण क्षमता फेरोसिमेंट तंत्रज्ञानातून वाढवता येऊ शकेल. त्याचे प्रात्यक्षिक अश्विननगर येथे अभियंता उल्हास परांजपे आणि विजय खरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे करण्यात आले.
मुंबईस्थित जलवर्धिनी प्रतिष्ठान आणि कार्डियन करेक्ट इंटरनॅशनल फाउंडेशन यांच्यावतीने अल्प खर्चात ग्रामीण भागात उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाच्या माध्यमातून लोकसहभागातून पाणी साठवण क्षमता निर्माण करता येईल. यासाठी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी अश्विननगर येथील एका बंगल्यात दीड हजार लिटर पाण्याची टाकी उभारण्यात आली. मनरेगाच्या माध्यमातून या संदर्भात शासनाने निर्णय घेऊनही त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. यामुळे या विषयाच्या जनजागृतीसाठी कार्डिअन करेक्ट स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेतला आहे. संस्थेचे नितीन गायकर, रोशन बधाण यांनी ग्रामस्थांना या विषयाची सुलभता लक्षात यावी, यासाठी जलवर्धिनी प्रतिष्ठानला विनंती केली होती. जलवर्धिनी प्रतिष्ठानने गेल्या वर्षी सुरगाणा येथे गुरुजी रुग्णालय सेवा प्रकल्पासाठी हा उपक्रम राबविला होता. साधारण अडीच ते तीन रूपये प्रति लिटर खर्चात १०० वर्षे टिकेल अशी पाण्याची टाकी एक हजार ते ३० हजार लिटपर्यंत लोकसहभागातून तयार होऊ शकते, असे जलवर्धिनी प्रतिष्ठानचे तांत्रिक सहायक विजय खरे यांनी सांगितले. विविध कंपन्यांनी सामाजिक सेवा दायित्वच्या माध्यमातून नंदुरबार येथील कृषी विज्ञान केंद्रात हा उपक्रम प्रतिष्ठानने राबविला आहे. जिल्ह्यात आदिवासी भागात आणि दुष्काळी तालुक्यात शेततळे आणि मत्स्यपालनसाठी हा उपक्रम कार्डिअन करेक्ट स्वयंसेवी संस्था राबवू इच्छिते, असे संस्थेचे नरेंद्र अमृतकर, पवन कोठावदे आणि गोकुळ पूरकर यांनी सांगितले.
नारळाच्या काथ्या, केळीचे धागे
जमिनीखालील आणि जमिनीवरील पाण्याच्या टाक्या, नारळाच्या काथ्या, अंबाडी, केळीचे धागे असा ग्रामीण भागात उपलब्ध होणारा कच्चा माल वापरून हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ferrocement technology increase water storage capacity demonstration ashwinnagar amy