शहरात संगीत महाविद्यालयासाठी प्रसिध्द गायक सुरेश वाडकर यांनी खरेदी केलेल्या भूखंड प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. वाडकर यांच्या स्वीय सहायकास संबंधित जागेवर जाण्यापासून अडवित दोन संशयितांनी दरगोडे बंधूंसाठी १५ तर, टोळीसाठी पाच अशी सुमारे २० कोटींच्या खंडणीची मागणी केली. खंडणी न दिल्यास मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पाणी टंचाईच्या सावटात अनास्था; आढावा बैठकीकडे लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांची पाठ

गायक वाडकर यांच्या भूखंड खरेदीचा विषय एक ते दीड दशकांपासून गाजत आहे. मागील महिन्यात शहरात आयोजित पुरस्कार सोहळ्यात वाडकर यांचा जीवनगौरव पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी नाशिकमध्ये संगीत महाविद्यालयासाठी जागा खरेदी व्यवहारात कशी फसवणूक झाली, ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मांडले होते. या व्यवहारात बरेचसे काम होत आले असून उर्वरित काम कुठे अडकले ते माहीत नसल्याने हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी त्यांनी पवार यांच्याकडे केली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी वाडकर यांचे मुंबईप्रमाणेच नाशिकमध्ये संगीत महाविद्यालय सुरू करण्याचे स्वप्न आम्ही पूर्ण करू, असे आश्वासन दिले होते. धमकावल्याप्रकरणी स्वीय सहायक मुनीराज मीना यांनी तक्रार दिली. वाडकर यांची नाशिकरोड येथे सर्व्हे क्रमांक सात / १३ अ ही मिळकत आहे. मीना हे नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी जागेची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांना या जागेचे प्रकरण आमच्याकडे आल्याचे सांगून तडजोड होईपर्यंत या ठिकाणी प्रवेश करू नये, असे धमकावले. दरगोडे बंधूना १५ कोटी आणि आमच्या टोळीसाठी पाच कोटी रुपये द्यावेत, अन्यथा जिवे मारण्यात येईल, अशी धमकी दिल्याचे मीना यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात खंडणी आणि धमकी प्रकरणी दोन संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी सांगितले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suresh wadkar pa threatened and demand for extortion money of rs 20 crores in land case zws
First published on: 07-02-2024 at 13:28 IST