लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक : देवळाली कॅम्प येथील फायरिंग रेंजवर तोफखान्याच्या सरावावेळी तोफगोळ्याचा स्फोट होऊन दोन अग्निविरांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी सरावावेळी अशा दुर्घटना घडलेल्या आहेत. तोफेतील तांत्रिक दोष वा सदोष तोफगोळे त्यास कारक ठरत असल्याचे सांगितले जाते.

तोफखाना दलाचे देशातील प्रमुख प्रशिक्षण केंद्र देवळाली कॅम्प येथे आहे. या ठिकाणी दलात दाखल होणाऱ्या अग्निविरांसह अधिकाऱ्यांना विविध अभ्यासक्रमांतर्गत प्रशिक्षण दिले जाते. देवळाली फिल्ड फायरिंग रेंज येथे गुरुवारी दुपारी १२ वाजता तोफखान्याचा सराव सुरु असताना ही दुर्घटना घडली. इंडियन फिल्ड गन या तोफेतून अग्निवीर तोफगोळे डागत होते. त्यावेळी एका गोळ्याचा जागीच स्फोट होऊन मोहिल विश्वराज सिंग (२०) आणि सैफत शित (२१) हे दोन अग्निवीर गंभीर जखमी झाले.

आणखी वाचा-उड्डाणपुलावरील दुरुस्ती कामामुळे गोंधळ; पूर्वकल्पना नसल्याने वाहनधारकांची गैरसोय, वाहतूक कोंडीत भर

धातूचे तुकडे त्यांच्या शरीरात शिरले होते. हे लक्षात येताच नाईक सचिन चव्हाण, नायब सुभेदार सुदेश मामेन, नायब सुभेदार सुंदरराज यांनी तातडीने त्यांना देवळाली कॅम्प येथील लष्करी रुग्णालयात नेले. परंतु, दोन्ही अग्निविरांचा तत्पूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. याबाबत देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two agniveer died in cannon blast during practice in devalali mrj