नाशिक – शहरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. एक अपघात दुचाकीवरुन तोल जावून पडल्याने तर, दुसरा वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झाला. पाथर्डी गावातील खंडोबा मंदिर भागात दुचाकीवरून तोल जावून पडल्याने २२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. रोहित पवार (मनपा कार्यालयासमोर, पाथर्डी गाव) असे युवकाचे नाव आहे.
रोहित बुधवारी रात्री खंडेराव मंदिर परिसरात दुचाकीवरून तोल जावून पडला. गंभीर दुखापत झाल्यामुळे कुटूंबियांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. नांदूरनाका ते तपोवन मार्गावरील सेलिब्रेशन लॉन्स भागात भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत २० वर्षांच्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.
किरण गायकवाड (रामटेकडी, तपोवन) असे दुचाकीस्वाराचे नाव आहे. गायकवाड शनिवारी रात्री नांदूर नाक्याकडून तपोवनच्या दिशेने दुचाकीने जात असताना चारचाकीची दुचाकीस धडक बसल्याने तो गंभीर जखमी झाला. बेशुध्द अवस्थेत कुटूबियांनी त्याला आडगावच्या वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
© The Indian Express (P) Ltd