शेखर हंप्रस, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबई : उन्हाळ्यात लग्न हंगाम नाही तर एखाद्या जन्मदिवसासाठीच्या जंगी मेजवानीत लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपून त्या क्षणाच्या स्मृती जतन करण्याचे काम करणारा कलाकार म्हणजे छायाचित्रकार. या छायाचित्रकारावर पहिला आघात छायाचित्रणाची उत्तम गुणवत्ता सिद्ध केलेल्या स्मार्ट फोनच्या जन्माने झालाच. पण २५ मार्चपासून लागू झालेल्या देशव्यापी टाळेबंदीमुळे हा कलाकार अस्तित्वात राहील की नाही, असे चित्र सध्या दिसत आहे. नवी मुंबईत आजवर १२ स्टुडिओ बंद पडले आहेत.

छायाचित्रकारांना सलग चार महिने व्यवसाय मिळालेला नाही. यात उन्हाळ्यात लग्नसमारंभातील छायाचित्रणाची मोठी संधी वाया गेली आहे. याशिवाय शैक्षणिक वर्षांच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या ओळखपत्रावरील ‘पासपोर्ट’ आकाराचे छायाचित्रही काढून देता आलेली नाहीत.

‘भाडे न परवडणारे’

नवी मुंबईत सुमारे १५० स्टुडिओ आहेत, मात्र दुकानासाठी असलेले भरमसाट भाडे अनेकांना न परवडणारे आहे. त्यात टाळेबंदीत भाडय़ासाठीचा एक रुपयासुद्धा कमावणे शक्य झालेले नाही. गेल्या १५ दिवसांत किमान १० ते १२ स्टुडिओ बंद झाल्याची माहिती छायाचित्रकार किरण शिवणकर यांनी दिली.

काही उरले नाही..

* गेल्या काही वर्षांत छायाचित्रण व्यवसायाने कॉर्पोरेट स्तरावर मोठी मजल मारली होती,  मात्र आरंभापासूनच या व्यवसायाची सरकारदरबारी उपेक्षा होत गेली.

* छायाचित्रण ‘डिजिटल’ झाले. त्यामुळे घरोघरी आलेल्या स्मार्ट फोन आणि छोटय़ा कॅमेऱ्यांमुळे हा व्यवसाय इव्हेन्ट आणि शाळा महाविद्यालयांत लागणाऱ्या ओळखपत्र आणि पारपत्रासाठी लागणाऱ्या छायाचित्रापुरताच  सीमित राहिला.

* हौस म्हणून स्टुडिओत छायाचित्र काढून घेण्यासाठी जाणाऱ्या लोकांची संख्या अगदीच नगण्य आहे.

* याच वेळी विवाहाच्या आधी तरुण-तरुणींचे केले जाणारे छायाचित्रण, अल्बम तयार करणाऱ्या छायाचित्रकारांना करोनाचा मोठा फटका बसला आहे.

५० जणांचे फोटो काय काढायचे?

छायाचित्रकार हा व्यावसायिक आहे, हे सरकार विसरले आहे. संपूर्ण टाळेबंदीच्या काळात आम्हाला कोणतीही मदत झाली नाही. लग्नाचा हंगाम सुरू होणार असल्याने अनेकांनी कर्ज काढून लाख रुपयांचे कॅमेरे विकत घेतले होते. टाळेबंदीत नियमावली लागू करण्यात आली. त्या विवाहसोहळ्यात फक्त ५० जणांच्या उपस्थितीची अट होती. त्यामुळे अनेकांनी छायाचित्रकाराला वगळल्याने तोटा पदरी पडल्याची माहिती अशपाक काजी यांनी दिली. नव्या शैक्षणिक वर्षांत अद्याप शाळाच सुरू न झाल्याने ‘पासपोर्ट’ आकाराची छायाचित्रे काढण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे अनेकांनी हा व्यवसाय सोडून इतर छोटय़ा धंद्यांना प्राधान्य दिल्याचे अभिषेक कुलकर्णी म्हणाले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 12 photo studios closed in navi mumbai during 15 days zws