नवी मुंबई : अरेंजा कॉर्नर ते कोपरी सिग्नल उड्डाणपुलासाठी प्रस्तावित असलेल्या ३९० झाडांच्या तोडीला पर्यावरणप्रेमींचा विरोध वाढत आहे. अशातच उड्डाणपुलाचे कंत्राट नियमबाह्य़ पद्धतीने दिल्याचा आरोप करत ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक यांनीही या उड्डाणपुलाला विरोध केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील सत्ताधारी घटक पक्षाच्या एका बडय़ा नेत्याच्या दबावाखाली त्याच्या नातेवाईकाला देण्यात आले असल्याचा आरोप गणेश नाईक यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात केला असून हे कंत्राट देताना नियमांचे सर्रास उल्लंघन झाले असून २० टक्के जास्तीच्या रकमेची निविदा मंजूर करण्यात आली आहे, असेही नाईक यांनी सांगत उड्डाणपुलाचे कंत्राटच रद्द करावे अशा मागणी  केली आहे. पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची भाजप शिष्टमंडळाने भेट घेत आयुक्तांना गणेश नाईक यांचे पत्र दिले. नवी मुंबई महानगरपालिका नगरसेवकपदाचा कालावधी विसर्जित झाल्यापासून राज्यातील सत्ताधारी घटक पक्षातील एका नेत्याची मर्जी राखण्याकरिता महानगरपालिकेमार्फत अनावश्यक कामे करण्यास प्राधान्य दिले जात आहे. ठरावीक प्रभागांमध्येच कोटय़वधी रुपयांची कामे करण्यात आली आहेत, ही अनावश्यक कामे राजकीय दबावाखाली करण्यात येत असून शहरात अनावश्यक कामे करून नवी मुंबईकरांच्या पैशाची लूट करून कोणाला तरी गैरमार्गाने लाभ मिळवून देण्याकरिता हे सर्व सुरू आहे.

उड्डाणपुलाच्या बाबतीतही असाच प्रकार असून याआधी सीसीटीव्हीची १५० कोटींची निविदा २७१ कोटींवर नेण्यात आली. त्यानंतर आवाज उठवल्यावर  पालिका प्रशासनाने पुनर्विलोकन करून या कामाचा खर्च १७५ कोटी इतका  कमी करण्यात आला. महानगरपालिकेच्या निधीची अनावश्यक कामांवर उधळपट्टी करण्याचे प्रकार सुरूच असून पामबीच मार्गावरील अरेंजा सर्कल ते कोपरी अनावश्यक उड्डाणपूल बांधण्याचे काम घाईघाईत मंजूर करून त्याचा कार्यादेश देखील नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.

वाहतूक कोंडीचे कारण सांगून पाम बीच मार्गावर उड्डाणपुलाचा घाट घालण्यात आला आहे. उड्डाणपुलाचे कंत्राट हे राज्यातील सत्ताधारी घटक पक्षाच्या एका बडय़ा नेत्याच्या दबावाखाली त्याच्या नातेवाईकाला देण्यात आले आहे. हे कंत्राट देताना नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात आले असून तब्बल २० टक्के जास्तीच्या रकमेची निविदा मंजूर करण्यात आली आहे.

महानगरपालिकेने यापूर्वी निविदांमध्ये एस्केलेशन बंद केले होते मात्र या उड्डाणपुलाच्या ठेकेदारासाठी महानगरपालिकेने उदार होऊन एस्केलेनश देण्याचे मान्य केले आहे. शिवाय या उड्डाणपुलासाठी ठेकेदाराने स्वत:चा आर.एम.सी. प्लँट उभा करणे आवश्यक असताना महानगरपालिकेने स्वत:च्या जागेत त्याला आर.एम.सी. प्लँट स्थापन करण्यास परवानगी दिली आहे. या उड्डाणपुलासाठी अन्य चार कंपन्या आल्या होत्या, परंतु राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या एका नेत्याच्या दबावामुळे आणि अट्टहासामुळे एन.सी.सी. या ठेकेदाराला या उड्डाणपुलाचे काम देण्यात आले आहे. या उड्डाणपुलाची रचना तांत्रिकदृष्टय़ा सदोष तर आहेच  शिवाय या प्रकल्पाचा खर्च कोणाला तरी अनुचित लाभ मिळवून देण्यासाठी फुगविण्यात आला आहे. मुंबईवरून पामबीच मार्गावर येणारी वाहने तसेच या उड्डाणपुलावरून अरेंजा कॉर्नर येथे उतरणाऱ्या वाहनांमुळे पामबीच मार्गावर भविष्यात प्रचंड वाहतूककोंडी निर्माण होईल. तसेच वाहतूक नियंत्रण विभागाने हा उड्डाणपूल बांधू नये असा स्पष्ट अभिप्राय नोंदवला असताना या उड्डाणपुलाचा अट्टहास कुणासाठी? आणि का? त्यामुळे या उड्डाणपुलाचे काम सभागृह अस्तित्वात येईपर्यंत रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. उड्डाणपुलासाठी सुमारे ३९० झाडांची कत्तल होणार असून संपूर्ण नवी मुंबईतून पर्यावरणप्रेमींचा उड्डाणपुलाला विरोध वाढत आहे.

अद्याप महानगरपालिकेने उड्डाणपुलासाठी बाधित होणाऱ्या झाडांबाबत राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाकडून कोणतीही परवानगी घेतली नसतानासुद्धा उड्डाणपुलाचा कार्यादेश कोणाच्या दबावाखाली घाईघाईत देण्यात आला आहे.   अनावश्यक आणि पालिकेच्या पैशाची उधळपट्टी करणारा उड्डाणपूल तातडीने रद्द करा त्याऐवजी शहरात नागरिकांकरिता आवश्यक आणि गरजेच्या सुविधांवर हा खर्च करावा, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने केली.

ऐरोली, नेरुळ व बेलापूर इत्यादी ठिकाणी महानगरपालिकेची रुग्णालये अद्याप पूर्ण क्षमतेने  कार्यान्वित झालेली नाहीत, ती पूर्ण क्षमतेने सुरू करण्याकरिता अनावश्यक उड्डाणपुलावरील खर्च टाळून हा निधी या रुग्णालयांसाठी खर्च करावा.  त्या कामांना प्राधान्य द्यावे, असे नाईक यांनी म्हटले आहे.

उड्डाणपूल उभारणीस कडाडून विरोध – आव्हाड

राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रस्तावित उड्डाणपुलास कडाडून विरोध असल्याचे सूतोवाच नवी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात बोलातना केले. यासंबंधी पालकमंत्र्यांनी हस्तक्षेप केला काय किंवा नाही केला काय आमचा उड्डाणपूल उभारणीस कडाडून विरोध असेल, असे आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. पुलाबाबत नवी मुंबईकरांचे मत जाणून घेतले का असा सवाल करीत आव्हाड यांनी आयुक्तांवर टीका केली.

‘मी पुण्याला जाताना पाम बीचचा वापर करतो.  कधीही येथे वाहतूक कोंडी होत नाही. केवळ गर्दीच्या वेळी सतरा प्लाझा येथे थोडीबहुत वाहतूक कोंडी होते. त्याला बाह्यवळण असा काही मार्ग होऊ शकतो का याचा अभ्यास आवश्यक आहे. मात्र मनपाने असा वेगळा अभ्यास केलाच नाही. कार्यादेश जारी करण्याची  काढण्याची एवढी घाई का केली हेच कळत नाही’, असे ते म्हणाले.

नियमबाह्य व अनावश्यक कामांवर महापालिकेच्या पैशाची लूट सुरू आहे. आरोग्य, शिक्षण, पाणी आणि अत्यावश्यक नागरी सुविधांवर पालिकेचा निधी प्राधान्याने खर्च व्हायला हवा. अरेंजा कॉर्नर ते कोपरी सिग्नल उड्डाणपुलाचे काम रद्द केले नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन करू.  – गणेश नाईक, आमदार

कोस्टल रोड, वाशी पाम बीच मार्ग अशी आवश्यक कामे महापालिकेने  प्राधान्याने करावी. निवडणुका होऊन लोकप्रतिनिधींचे सभागृह अस्तित्वात आल्यावर अरेंजा ते कोपरी उड्डाणपुलाच्या प्रकल्पावर साधक-बाधक चर्चा करून निर्णय घेता येईल. – जयवंत सुतार, माजी महापौर

अरेंजा ते कोपरी उड्डाणपुलाच्या कामाबाबत अनियमितता नाही. झाडांच्या बाबतीत २० जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. सदर हरकतींचा सांगोपांग विचार करून अहवाल शासनाकडे पाठवला जाईल. याबाबत राज्य वृक्ष प्राधिकरण समिती याबाबत आवश्यक कार्यवाही करेल.अभिजीत बांगर, आयुक्त

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mla ganesh naik allegations over irregularities on flyover contract zws
First published on: 25-05-2022 at 00:08 IST