नवी मुंबईत सीसीटीव्ही केबल्ससाठी सर्वत्र खोदकाम सुरू आहे. सीसीटीव्हीमुळे नागरिकांच्या सुरक्षेत भर पडेल, मात्र हे करीत असताना नियोजनाअभावी काही महिन्यांपूर्वी पदपथ आणि रस्त्यांच्या कामाचा बोजवारा उडाला आहे. सीसीटीव्ही बसवणे नक्की असल्याने त्याच्या केबल्स टाकून पदपथ रस्त्यांची सुधारणा केली असती तर लाखो रुपयांचे नुकसान टळले असते, असा सूर उमटत आहे.  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबईत सुमारे एक हजार आठशे सीसीटीव्ही बसवण्याचे काम सुरू झाले आहे. हा उपक्रम अतिशय चांगला आणि उपयुक्त आहे. हा उपक्रम राबविण्यात येणारच आहे, हे माहिती असूनही अभियांत्रिकी विभागाने पदपथ आणि रस्ते दुरुस्ती, डागडुजी, तसेच गरज असेल तेथे रस्त्यांचे डांबरीकरण केले आहे. ही कामे करून आठ दहा महिन्यांचा कालावधी उलटला आहे, काही ठिकाणी तर दोन तीन महिनेही झालेले नाहीत. हीच बाब पदपथांची आहे. नियोजनबद्ध पद्धतीने अगोदर सीसीटीव्ही केबल्स टाकणे आणि नंतर रस्ता दुरुस्ती केला असता तर लाखो रुपये वाचले असते, अशी माहिती याच विभागातील एका कर्मचाऱ्याने दिली.

हेही वाचा – विश्लेषण: कल्याण ते नवी मुंबई १५ मिनिटांत? ऐरोली-काटई मार्ग वाहतुकीसाठी महत्त्वाचा कसा?

सध्या हे काम कोपरखैरनेत सुरू असून दहा ते बारा दिवस उलटून गेले तरीही काम पुढे सरकत नाही. खड्ड्याचा राडारोडा ठिकठीकाणी पडला असून त्यावरून दुचाकी घसरून छोटे अपघातही होत आहेत. असाच एक अपघात सेक्टर १९ येथे शनिवारी झाला. सुदैवाने चालकाला फार मोठी दुखापत झाली नसली, तरी दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचा – नवी मुंबई : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा जेरबंद

पदपथावरील पेव्हर ब्लॉक उखडून ठेवले आहेत. त्यातील अनेक पेव्हर ब्लॉक अनधिकृत फेरीवाल्यांनी पळवले असून त्याच्या आधारे एखादी फळी टाकून त्यावर व्यवसाय थाटला जातो अशी माहिती सेक्टर १८ येथील एका व्यापाऱ्याने दिली. त्याच्या दुकानासमोरील खोदलेल्या पदपदपथातील पेव्हर ब्लॉक असेच एका अनोळखी व्यक्तीने नेले आहे.

सीसीटीव्हीच्या केबल्ससाठी हे खोदकाम होत असून लवकरात लवकर काम करण्याचे आदेश देण्यात येतील, जेणेकरून गैरप्रकार, अपघात टाळले जातील, अशी प्रतिक्रिया शहर अभियंता (नवी मुंबई मनपा) यांनी दिली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cctv cable initiative in navi mumbai stalled due to slow pace ssb