डॉ. नंदिनी वि. देशमुख, मराठी विज्ञान परिषद

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सागरातले अनेक सजीव छद्मावरणाच्या मार्गाने स्वत:चे रक्षण करतात. जमिनीवर छद्मावरणाचा आसरा घेणे सोपे असते कारण येथे झाडे, माती, दगड-धोंडे अशा परिसरात लपणे सहज जमते. सागरात वरच्या बाजूने उजेड आणि इतर सर्व बाजूंनी पाणी असल्यामुळे छद्मावरण पद्धतीही निरनिराळय़ा प्रकारच्या असतात. काही प्राणी स्वत:ला सुशोभित करून घेतात. तऱ्हेतऱ्हेचे खेकडे, सी-ड्रॅगनसारखे मासे हे चटकन पाण्यात ओळखूही येत नाहीत. एखादी वनस्पती पाण्याच्या प्रवाहावर हलकेच तरंगावी अशा हालचाली पर्णसंभारासारख्या दिसणाऱ्या सी-ड्रॅगनने केल्यामुळे वनस्पती आहे असे भासून तो भक्षकापासून वाचतो. काही माशांच्या शेपटीच्या बाजूला डोळे असावे असे ठिपके असतात, तर काहींच्या संपूर्ण शरीरावरच अशा ‘डोळय़ांची’ ओळ  दिसते. खरे डोळे दुसरीकडेच असतात. परंतु या फसवणुकीमुळे भक्ष्य आणि भक्षकाचाही गोंधळ उडतो.

काही जलचर आपला रंग पटापट बदलू शकतात. उदाहरणार्थ मृदुकाय ‘ऑक्टोपस’! आजूबाजूच्या परिसराप्रमाणे स्वत:चा रंग बदलून हा गुपचूप बसल्यावर भक्ष्य आपसूकच त्यांच्या तावडीत सापडतात आणि भक्षकापासूनदेखील त्यांचे रक्षण होते. भाकस किंवा लेपटय़ा हे चपटे मासे समुद्रतळाशी राहतात. ते दर आठ सेकंदांना रंग बदलू शकतात. समुद्राच्या वरच्या थरातील बरेचसे प्राणी पारदर्शक असतात. छोटय़ा प्लवकांपासून ते जेलीफिश, साल्पा असे युरोकोर्डेट प्राणी दृष्टीसही पडत नाहीत. काही सागरी जीवांच्या डिंबक अवस्था पूर्णपणे पारदर्शक असतात. पाण्यातल्या बऱ्याच माशांचे खवले प्रकाशाचे परिवर्तन उत्तम रीतीने करतात.

समुद्रतळाशी असणारा भक्षक ज्या वेळी वर पाहतो, तेव्हा चंदेरी मासे त्यांना खालून दिसत नाहीत कारण आकाशाची पार्श्वभूमी प्रकाशित असते. वरच्या बाजूने एखाद्या पक्ष्याने पाण्याकडे पाहिले तर वरूनही हे मासे दिसून येत नाही, कारण माशांच्या वरच्या बाजूला गडद छटा असल्यामुळे खोल पाण्याच्या पार्श्वभूमीवर ते दिसत नाहीत. बांगडा, तारल्या या माशांत अशा प्रकारची  रंगसंगती आढळून येते. काही माशांमध्ये वेडेवाकडे पर आणि काटय़ासमान अवयव असल्यामुळे त्यांचा आकार आहे त्यापेक्षा बराच मोठा भासतो. यांची बाह्यरेषा नक्की कोणती हे बघणाऱ्याला कळत नाही आणि त्यामुळे त्यांना संरक्षण मिळते. नैसर्गिकरीत्या उत्क्रांत होत असताना सागरी जीवांना मिळालेली ही देणगी आहे.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kutuhal in the ocean many sea creatures use camouflage protect ysh