डॉ. बोमन फ्रामजी छापगर या जागतिक ख्यातीच्या सागरी जीवशास्त्रज्ञाने समुद्र विज्ञानावरील दोन अतिशय महत्त्वाची पुस्तके लिहिली. त्यापैकी ‘मरीन लाइफ ऑफ इंडिया’ हे पुस्तक २००५-२००६ च्या सुमारास तयार झाले होते. ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस’ने छापलेल्या या पुस्तकाच्या २००० प्रती २००५ च्या मुंबई महानगरात आलेल्या पुरात, विक्रीस येण्याआधीच वाहून गेल्या. परंतु हताश न होता सरांनी पुन्हा २०१३ साली ‘अंडरस्टँडिंग द सी’ या पुस्तकाचे लेखन पूर्ण करून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस आणि बीएनएचएसच्या मदतीने ते प्रसिद्ध केले. एव्हाना त्यांची दृष्टीदेखील अंधूक झाली होती. अंधत्वाकडे प्रवास करतानाही लेखनिकाच्या मदतीने त्यांनी हे पुस्तक पूर्ण केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> कुतूहल : समुद्र पक्ष्यांचे स्थलांतर

पहिल्या पुस्तकात भारतातील किनाऱ्यांवर आढळणाऱ्या अनेक विविध प्राण्यांची सखोल माहिती आहे, तर दुसऱ्या पुस्तकात केवळ जीवशास्त्र दिलेले नसून सागरासंबंधी अनेक बाबी अतिशय खेळकररीत्या आणि काव्यात्मक पद्धतीने लिहिल्या आहेत. ऐतिहासिक काळापासून सुरू असलेल्या समुद्रसफरींपासून थेट ‘माणसे समुद्रात का बुडतात?’ अशा विषयांवर या पुस्तकात माहिती आहे. पुस्तकात एकूण ४२ प्रकरणे असून त्यामध्ये प्लवक, तलस्थ सजीव, एकएकटे पोहणारे प्राणी अशा सर्वांची माहिती आहे. तसेच छद्मावरण, जीवदीप्ती, बायोरिदम, समुद्रातील आवाज, वाळूबद्दलची माहिती, प्रवाळ भित्तिकेची रचना, समुद्रातून मिळणारी संसाधने, मासेमारीच्या पद्धती अशा विविध बाबींचा ऊहापोह केलेला आहे.

हेही वाचा >>> कुतूहल:‘स्फेनीसिडी’ कुळातील पेंग्विन

समुद्रापासून विविध प्रकाराने ऊर्जा मिळवली जाते, त्यापैकी छापगर यांनी पवन ऊर्जा, सागर लहरींपासून मिळणारी ऊर्जा यांचीही माहिती दिली आहे. समुद्रातील निरनिराळे प्रवाह, भरती-ओहोटी, लाटा, समुद्राच्या अंतर्गत भागात असणारे प्रवाह, त्सुनामीसारख्या महाभयानक नैसर्गिक आपत्ती अशा बाबी भौतिक समुद्रशास्त्र शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुलभ पद्धतीने जाणून घेता येतात. समुद्राच्या अंतर्गत अभिसरण आणि रसायनशास्त्र याबाबत पुस्तकात दोन पाठ आहेत. ‘मरीन फार्मसी’ या पाठात त्यांनी समुद्रातील घटकांतून मिळणाऱ्या औषधांची माहिती दिली आहे. केवळ समुद्रच नव्हे तर अढळ दीपस्तंभासारखे समुद्राशी जोडले गेलेले विषयदेखील त्यांनी पुस्तकात हाताळले आहेत. छापगर हेदेखील एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे अनेक सागर विज्ञान विषयप्रेमींसाठी मरणोत्तरदेखील मार्गदर्शन करत आहेत.

– डॉ. नंदिनी वि. देशमुख

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Understanding the sea by author dr boman framji chhapgar zws