बोईसर : मागील अनेक वर्षे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या पालघर जिल्ह्यातील १२१ किलोमीटर रस्त्यांच्या बांधकामासाठी १०५ कोटी २० लाख रुपये आणि दुरुस्तीसाठी आठ कोटी ८१ लाख रुपये, असा एकूण ११४ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत एकूण १७ रस्त्यांच्या कामांसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा प्रवास पुढील काळात सुखकर होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागाला जोडणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती आणि मजबुतीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध होत नसल्याने त्यांची अक्षरश: चाळण झाली होती. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी नागरिक अनेक वर्षे प्रतीक्षा करीत होते. यातील बरेचसे रस्ते हे जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येत होते. जिल्हा परिषदेकडे या रस्त्यांच्या कामांसाठी निधी नसल्याने हे रस्ते पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत तयार करण्यासाठी प्रस्ताव तयार करून राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविला होता. राज्य सरकारने रस्त्यांच्या कामांचा प्रस्ताव अंतिम मान्यता व निधी उपलब्ध होण्यासाठी केंद्र सरकारकडे सादर केला होता. त्यानुसार तांत्रिक मान्यतेनंतर १७ रस्त्यांच्या कामांसाठी जवळपास ११४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या या रस्त्यांमध्ये डहाणू तालुक्यातील तीन, जव्हार तालुक्यातील दोन, तलासरीतील दोन, मोखाडय़ातील दोन, पालघरमधील तीन, विक्रमगडमधील तीन आणि वाडा तालुक्यातील दोन, अशा एकूण १७ रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे. या कामांमध्ये रस्त्यांचे रुंदीकरण, लहानमोठय़ा मोऱ्यांवरील पूल बांधणे आणि डांबरीकरण यांचा समावेश आहे. कंत्राटदारांना १२ महिन्यांमध्ये कामे पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे.

रस्त्याचे नाव आणि मंजूर निधी

  • बांधघर-निंबापूर भोयेपाडा रस्ता (६.९ किमी) – ४.६० कोटी
  • सारणी-उर्से-साये रस्ता (१५.१ किमी) – १८.५६ कोटी
  • गंजाड-धानिवरी रस्ता (८.२ किमी) – ६.६४ कोटी
  • परनाली-बोईसर रस्ता (९.३ किमी) – ७.९६ कोटी
  • वेळगाव- कोंढाण- मनोर रस्ता (७.६ किमी) – ८.५६ कोटी
  • बोरेशेती रस्ता (४.८ किमी) – ४.७ कोटी
  • केळीचा पाडा-दाभोसा रस्ता (३.८ किमी) – २.७८ कोटी
  • आडखडक-कुतुरविहीर रस्ता (३.२ किमी) – १.८६ कोटी
  • तुळयाचा पाडा-हिरवे रस्ता (४.३ किमी) – ३.२६ कोटी
  • झरी-सवणे रस्ता (५.० किमी) – ४.०४ कोटी
  • संभा- सवणे- वडवली रस्ता (८.९ किमी) – ९.१ कोटी
  • कुर्झे-हातणे-देहर्जे रस्ता (५.१ किमी) – ३.९५ कोटी
  • चाबके तलावली-घाणेघर रस्ता (७.१ किमी) – ५.१८ कोटी
  • खुपरी-आंबिटघर रस्ता (९ किमी) – ८.८ कोटी
  • पोशेरी-पिंपळास-खरीवली रस्ता (४.३ किमी) – ८.९३ कोटी
  • मोरांडा-गोंदे रस्ता (६ किमी) – ३.४४ कोटी
  • केव- म्हसरोली- कुर्झे रस्ता (७.१ किमी) – ५.३५ कोटी
Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 114 crore for roads funded pradhan mantri gram sadak yojana citizens of rural areas ysh