पालघर: पालघर जिल्ह्यातील रेल्वे समस्यांबाबत दहिसर विधानसभा आमदार मनीषा चौधरी यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली आणि सविस्तर चर्चा केली. जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांवर योग्य सुविधा उपलब्ध करण्यात याव्यात, अशा त्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करू, असे रेल्वेमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रेल्वेमंत्री ९ जून रोजी मुंबई दौऱ्यावर आले असता मनीषा चौधरी यांनी भेट घेऊन जिल्ह्यातील तसेच दहिसर विधानसभा क्षेत्रातील रेल्वे समस्या मांडल्या. पालघर जिल्ह्यातील निरस्त केलेल्या गाडय़ांचे थांबे पूर्ववत करणे, उत्तर भारतातील राज्यांत शेतमाल पाठवण्यासाठी जिल्ह्यातील स्थानकांवर सुविधा निर्माण करणे, डहाणूपर्यंत उपनगरीय सेवा वाढवणे तसेच दहिसरमधील रेल्वे समस्या इत्यादी मागण्यांचे निवेदन रेल्वेमंत्र्यांना देण्यात आले. मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे उप सेक्रेटरी हृदयनाथ म्हात्रे यांनी पालघर जिल्ह्यातील समस्यांचे निवेदन आमदार मनीषा चौधरी यांना दिले होते.

पालघर स्थानकांतील रद्द केलेले स्वराज एक्सप्रेस, वांद्रे अजमेर, म्हैसूर अजमेर एक्स्प्रेसचे थांबे पूर्ववत करणे तसेच कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेल्या पुणे इंदूर द्विसाप्ताहिक एक्सप्रेसला पर्याय दौंड इंदूर एक्स्प्रेसला पालघर स्थानकात थांबा देण्यात यावा अशी आग्रही मागणी रेल्वेमंत्र्यांकडे करण्यात आली. पालघर स्थानकातील उत्तम प्रतिसाद मिळणारे तीन गाडय़ांचे थांबे काढण्यात आले आहेत, तर स्थानकात थांबा असणाऱ्या दोन गाडय़ा कायमस्वरूपी बंद करण्यात आल्या आहेत. तसेच सफाळे येथील लोकशक्ती एक्स्प्रेसचा थांबा रद्द केल्यामुळे प्रवासी वर्गात नाराजी आहे.

पालघर जिल्ह्यातील केळवे-माहीम परिसरातून मोठय़ा प्रमाणात विडय़ाची पाने, शेतमालाचे उत्पादन डहाणू, बोईसर- चिंचणी भागातून मोठय़ा प्रमाणावर शेतमालाचे उत्पादन घेतले जाते. उत्तर भारतात शेतमाल पाठवणे सोपे व्हावे आणि शेतकऱ्यांना कुठलीही अडचण येऊ नये यासाठी तरतूद करण्याची विनंती करण्यात आली आहे. दरम्यान, सौराष्ट्र एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करण्यात आल्यामुळे मुंबई, वसई, विरार भागाकडून वैतारणा ते डहाणू दरम्यानच्या स्थानकांवर प्रवास करणाऱ्या शिक्षक, नोकरदार तसेच प्रवासी वर्गाला पर्याय उपलब्ध नाही, अशी तक्रार शिक्षक भगिनींनी मनीषा चौधरी यांच्याकडे केली होती. या तक्रारीची दखल घेऊन सौराष्ट्र एक्सप्रेसची वेळ पूर्ववत करावी अथवा त्यावेळेत मुंबईहून डहाणूसाठी अतिरिक्त लोकल सेवा सुरू करावी याकरिता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच मंडळ रेल्वे प्रबंधक, मुंबई यांना पत्र लिहिले आहे. अशी लोकल सुरू झाल्यास प्रवाश्यांची योग्य सोय होऊन वेळही वाचेल, असा विश्वास मनीषा चौधरी यांनी व्यक्त केला.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla manisha chaudhary discusse railway problems of palghar with rail minister zws