-
तब्बल सहा दशके हिंदी चित्रपटसृष्टीत नायक ते खलनायक आणि पुढे चरित्र अभिनेता अशा प्रदीर्घ कारकिर्दीतील अभिनयाने ठसा उमटवणाऱ्या अभिनेते प्राण यांची आज (12 फेब्रुवारी) जयंती. १९४० ते २००७ या काळात अभिनेते प्राण यांनी हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली. (all photos : Express Archives)
-
जुन्या दिल्लीतील कोटगड येथे १९२० साली एका श्रीमंत पंजाबी कुटुंबात जन्माला आलेल्या प्राण यांचे आयुष्यही नाटय़मय घटनांनी भरलेले होतं. प्राण यांचे वडील लाला केवल कृष्ण सिकंद कंत्राटदार हे होते.
-
सरकारी कामानिमित्तानं ते सतत भ्रमंती करीत राहायचे. त्यामुळे प्राण यांचे शालेय शिक्षण कपूरथला, उन्नाव, मेरठ, डेरहादूत आणि रामपूर येथे झाले. गणितात विशेष प्राविण्य असलेल्या प्राण यांना मात्र छायाचित्रकारितेचा छंद होता.
-
या छंदाचे व्यवसायात रूपांतर करण्याच्या निमित्ताने ठिकठिकाणी भटकणाऱ्या प्राण यांची गाठ लाहोरमध्ये चित्रपट लेखक वाली मोहम्मद यांच्याशी पडली आणि त्यांच्याच ओळखीतून पंजाबी चित्रपट निर्माते दलसुख पांचोली यांच्या ‘यमला जट’ चित्रपटात त्यांना पहिली भूमिका मिळाली.
-
१९४२ साली याच पांचोलींनी त्यांना ‘खानदान’ या आपल्या हिंदी चित्रपटात भूमिका दिली. त्यानंतर १९४२ ते ४६ पर्यंत तब्बल २२ चित्रपटांमधून प्राण यांनी काम केले होते. पण, त्यांची ही कारकिर्द बहरली होती ती लाहोरमध्ये. भारत-पाकिस्तान फाळणीमुळे त्यांच्या या बहरत्या कारकिर्दीला जोरदार धक्का बसला. त्यानंतर प्राण यांनी मुंबई गाठली.
-
फाळणीचे हे निखारे प्राणजींच्या काळजात पुढेही धुमसत राहिले. फाळणीच्या वणव्यात सापडलेल्या कोणत्याही पंजाबी माणसांप्रमाणे प्राणसाहेबांच्या मनात काँग्रेसबद्दल राग होता. इतर कलाकारांप्रमाणे ते राजकारणात कधीच पडले नाहीत. मात्र आणीबाणीविरुद्ध चित्रपट कलाकारांचा पक्ष काढण्यात त्यांनी देव आनंद आणि विजय बंधूंना कडवी साथ दिली. फाळणीनंतरच्या मुंबईतल्या दिवसांनी प्राणसाहेबांचा अंतर्बाह्य़ कायापालट केला.
-
मुंबईत आल्यानंतर आठ महिन्यांनी त्यांना नाटककार सआदत हसन मंटो यांच्यामुळे देव आनंद आणि कामिन कौशल यांची मुख्य भूमिका असलेला बॉम्बे टॉकीजचा जिद्दी चित्रपट मिळाला. या जिद्दी चित्रपटाने नायक म्हणून देव आनंदला यश मिळवून दिले आणि प्राण यांची अभिनयाची गाडी हिंदी चित्रपटसृष्टीत जोरदार धावू लागली.
-
प्राण यांच्या ५७ वर्षांच्या लांबलचक कारकिर्दीत त्यांनी ३५० चित्रपटांमधून काम केले. हिंदी चित्रपटसृष्टीत खलनायक म्हणून प्रेमनाथ, प्रेम चोप्रा, अजित, अमरीश पुरी अशा काही मोजक्याच कलाकारांनी आपली स्वत:ची एक शैली निर्माण केली होती. प्राण यांचे नाव या परंपरेत सर्वात वर राहिले.
-
केवळ खलनायक म्हणून नव्हे, तर चरित्र नायक म्हणूनही त्यांनी आपला ठसा उमटवला होता. खलनायकाच्या भूमिकेमुळे अनेक जण त्यांचा द्वेषही करत असत. मात्र, प्रत्यक्षात प्रेमळ स्वभावाच्या प्राण यांचे चित्रपटसृष्टीमधील अनेकांशी जिव्हाळ्याचे संबंध होते.
-
हिंदी चित्रपटातला खलनायकीचा इतिहास नायकगिरी इतकाच दीर्घ व सुरस आहे. याकुब, कन्हैय्यालाल या खंद्या नटांपासून परेश रावल आणि अमरीश पुरी या अष्टपैलू नटांनी तो समृद्ध केला. प्राण यांनी हिंदी चित्रपटातल्या व्हिलनला ‘स्टार’ बनवलं, हिरोच्या बरोबरीला नेलं आणि व्हिलनसाठी मोठा चाहतावर्ग निर्माण केला.
-
प्राणसाहेबांचं व्यक्तिमत्त्व दमदार होतं. त्यांच्या आवाजातली जरब; तिच्यातला हेटाळणीचा सूर; नजरेतला दरारा आणि गालाला पडणारी उपरोधिक घडी.. यामुळे त्यावेळी खलनायकीचं रेडिमेड मटेरिअल म्हणजे प्राण ठरले.
-
खलनायकाभोवती असं वलय निर्माण करण्यात यशस्वी ठरलेले प्राण हे पहिले व शेवटचे खलनायक होते. त्यांच्या समोरच प्रेम चोप्रा, शक्ती कपूर, गुलशन ग्रोव्हर ही खलनायकांची पुढची पिढी उभी राहिली.
-
छायाचित्रण, चित्रपटांबरोबरच त्यांचे क्रीडा क्षेत्रावरही अतोनात प्रेम होते. १९५० च्या दशकामध्ये त्यांचा डायनॉमोस फुटबॉल क्लब अनेकांचा चर्चेचा विषय बनला होता.
-
सहा दशके मोठा पडदा गाजवलेल्या प्राण यांचे जिस देशमे गंगा बहती है, जॉनी मेरा नाम, उपकार, बॉबी हे संस्मरणीय चित्रपट आहेत. 'जंजीर'मधली शेरखानची भूमिका प्राण यांनी अजरामर केली.
-
हिंदी चित्रपट सृष्टीला दिलेल्या योगदानाबद्दल अभिनेते प्राण यांचा २००१ मध्ये ‘पद्मभूषण’ किताब देऊन सन्मानित करण्यात आला होता. त्याचबरोबर त्यांनी फिल्मफेअर पुरस्कार, राज कपूर पुरस्कार यासारखे कित्येक मानाचे पुरस्कार मिळवले होते. भारतीय चित्रपटसृष्टी शंभरी ओलांडण्याच्या काळातच प्राण यांचा दादासाहेब फाळके जीवनगौरव या सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. अशा या हरहुन्नरी कलावंताला 12 जुलै 2013 रोजी काळानं हिरावून घेतलं.

गणराया आजपासून ११ दिवस मेष, वृषभ, सिंहसह ६ राशींना देणार भरपूर पैसा? अनंत चतुर्दशीपर्यंत बाप्पा तुमचं आयुष्य सोन्यासारखं उजळवणार