राज कपूर दिग्दर्शित या चित्रपटातून अभिनेत्री मंदाकिनी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. डोळ्यांत वेगळीच चमक असणारी ही अभिनेत्री ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेली. या चित्रपटातील तिचा साधाभोळा पण, तितकाच मादक अंदाज अनेकांची मनं जिंकून गेला. बोल्ड अंदाजामुळे चर्चेत आलेली ही अभिनेत्री येत्या काळात चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत दिसेल अशी अनेकांचीच अपेक्षा होती. पण, नियतीच्या मनात मात्र वेगळीच खेळी होती. मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी, कुख्यात डॉन दाऊदशी तिचे प्रेमसंबंध असल्याचेही म्हटले गेले होते. दाऊदसोबत नाव जोडले जात असल्याच्या चर्चांना उधाण येताच मंदाकिनी एकाएकी चित्रपटसृष्टीपासून दूर गेली. मंदाकिनी दाऊदसोबतचे प्रेमसंबंध कधीच स्वीकारले नाहीत. शारजात पार पडलेल्या क्रिकेट सामन्यामध्ये दाऊदसोबत तिलाही पाहण्यात आल्यामुळे तिच्याविषयी अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. दाऊद आणि मंदाकिनी यांच्या नात्याविषयी कलाविश्वातही बऱ्याच चर्चा रंगल्या. दाऊदच्या पार्ट्यांपासून ते अगदी विविध ठिकाणीही मंदाकिनी त्याच्यासोबत दिसल्याचे म्हटले गेले होते. मंदाकिनीचे खरे नाव यस्मिन जोसेफ. फार आधीपासूनच तिला अभिनय क्षेत्रात रस होता. हिंदी चित्रपटसृष्टीत तिची कारकीर्द फारशी वाखाणण्याजोगी नसली तरीही ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटामुळे आणि वादग्रस्त खासगी आयुष्यामुळे ती बऱ्याचदा प्रकाशझोतात आली. आपल्या वादग्रस्त खासगी आयुष्यातून बाहेर पडत मंदाकिनीने १९९५ मध्ये कागीर रिनपोसोबत लग्नगाठ बांधल्याचे म्हटले जाते. सध्या तिने चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला असून, मुंबईत एक तिबेटीयन हर्बल सेंटर चालवत असल्याचे म्हटले जाते. त्याशिवाय ती अनेकांना तिबेटीयन योगसाधनाही शिकवते असे म्हटले जाते. बॉलिवूडच्या झगमगाटापासून ‘आरके’ बॅनरची ही देखणी अभिनेत्री दूर असली तरीही प्रेक्षकांच्या मनात मात्र ती निरागस ‘गंगा’ आजही घर करुन आहे असेच म्हणावे लागेल.

“आता मरण आलं तरीही…”; २२ वर्षांपासून मराठमोळ्या अभिनेत्रीबरोबर लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता, लग्नाबद्दल म्हणाला…