अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान त्यांच्या लग्नाचा आठवा वाढदिवस साजरा करत आहेत. तैमुरनंतर पतौडी कुटुंबात आणखी एका चिमुकल्याचं आगमन लवकरच होणार आहे. २०१२ मध्ये करीनाने तिच्या आई-वडिलांना (रणधीर कपूर, बबीता) पळून जाऊन सैफसोबत लग्न करण्याचा इशाराच दिला होता. करीनाला सैफसोबत फक्त कुटुंबीयांच्या उपस्थितीतच लग्न करायचं होतं. तिला कुठलाही गाजावाजा किंवा माध्यमांचं लक्ष नको होतं. हीच गोष्ट पालकांना पटवण्यासाठी तिने सैफसोबत पळून जाऊन लग्न करण्याचा इशारा दिला होता. २०१३ मध्ये 'वोग' मासिकाला दिलेल्या मुलाखतीत तिने याबाबत खुलासा केला होता. "त्यांनी जर आमच्या पद्धतीने आम्हाला लग्न करू दिलं नाही तर सरळ लंडनला पळून जाऊन तिथे आम्ही गपचुप लग्न करू असा इशारा मी आईवडिलांना दिला होता", असं करीनाने सांगितलं. -
"आम्ही काय खातोय, कोणत्या डिझायनरचे कपडे घालतोय, कोणाला आमंत्रण दिलंय हेच लोकांना जाणून घ्यायचं असतं. आयुष्याच्या त्या महत्त्वाच्या टप्प्यावर आम्हाला कोणताच गोंधळ नको होता. म्हणून नोंदणी पद्धतीने विवाह केल्यानंतर आम्ही टेरेसवर जाऊन माध्यमांना अभिवादन केलं. त्यापेक्षा अधिक कोणाला काहीच माहित नाही," असंही ती म्हणाली. 'टशन' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान करीना व सैफ अली खान एकमेकांच्या प्रेमात पडले आणि २०१२ मध्ये दोघांनी लग्न केलं. मात्र सैफशी लग्नाचा पुनर्विचार करावा असं अनेकांनी लग्नाआधी बजावल्याचा खुलासा करीनाने 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये केला. "मला अनेकांनी बजावलं होतं की सैफ घटस्फोटीत आहे, त्याला दोन मुलं आहेत. तुझं करिअर संपेल. पुन्हा एकदा विचार कर नीट वगैरे. पण मला प्रश्न पडत होता की प्रेमात असणं हा काही इतका मोठा गुन्हा आहे का? मी विचार केला की लग्न करुया, बघू पुढचं पुढे काय होईल ते", असं तिने सांगितलं. अमृता सिंगसोबत घटस्फोटाच्या आठ वर्षांनंतर सैफने करीनासोबत लग्न केलं. सैफ व करीना यांच्या वयात दहा वर्षांचं अंतर आहे.

Donald Trump : रशिया चर्चेसाठी का तयार झाला? पुतिन यांच्या भेटीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, “भारतावरील…”