-
शाळेत जाण्याची मज्जाच वेगळी… सकाळची प्रार्थना… जेवणाची सुट्टी… सूर्य मावळतीकडे झुकला की, वर्गातून धूम ठोकायची घाई… पण, गेल्या वर्षाभरापासून शाळांची कूस जणू सुनी पडली आहे. ना शाळेच्या घंटेचा आवाज, ना राष्ट्रगीत… पण, म्हणून शिक्षणाची गंगा थांबवून कसं जमेल? (सर्व फोटो – पवन खेंगरे, इंडियन एक्सप्रेस)
-
समुद्राच्या लाटांप्रमाणे करोनाच्या लाटा सुरू झाल्या आणि शाळांचे दरवाजे बंद होऊन ई-शिक्षणाच्या स्क्रीन सुरू झाल्या. राज्य सरकारने विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबू नये म्हणून हा मधला मार्ग शोधला.
-
ई-शिक्षण म्हटलं की, नेटवर्क महत्त्वाचं पण, जिथे नेटवर्कच नाही, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं? हा प्रश्न घेऊन अनेक गावखेडी उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
-
सरकारकडून शिक्षणाचे धडे गिरवून घेण्याचं काम सुरू असलं, तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात सगळ्यात मोठा रोडा म्हणजे नेटवर्क.
-
त्यामुळे आधीच शाळा बंद आणि आता नेटवर्कही. यातूनच मार्ग काढत गावकऱ्यांनी उत्तर शोधलं.
-
ते म्हणतात ना 'गाव करी ते, राव काय करी' याच उक्तीतून प्रेरणा भोर तालुक्यातील म्हाळवाडी गावातील ग्रामस्थांनी प्रेरणा घेतली.
-
मुलं शाळेत जात नाही, नेटवर्क नसल्यानं शिक्षणाच्या नावानं खेळखंडोबाच. दिवसभर गावात भटकंती. या सगळ्यावर गावकऱ्यांनी पर्याय शोधला. अख्ख्या गावाचीच शाळा बनवली तर…?
-
कल्पनेची वात पेटली… आशेचा किरण दिसला आणि गावकऱ्यांनी मनावर घेतलं. अख्ख्या गावालाच शाळेचं रुप देण्याचं.
-
गावातल्या तरुण पोरांनी डोकं चालवलं उभी राहिली भन्नाट शाळा. जिचं कौतुक महाराष्ट्राभर होऊ लागलं आहे.
-
अवघ्या १२०० लोकवस्तीचं गाव. इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत वर्ग. शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या ५५ पण, वर्षांभरापासून शाळा बंद असल्याने आणि मुलाच्या प्राथमिक शिक्षणात खंड पडू नये म्हणून शाळेतील भिंतीप्रमाणेच गावातील भिंतीवर शिक्षणाचे धडे रंगवण्यात आले.
-
वर्षभरापासून शाळा बंद असल्यानं मुलांचं नुकसान होतं होतं. त्यावर पर्याय शोधण्याचा विचार केला आणि गावातील घरांच्या भिंतींवर शाळेतील भिंतींप्रमाणे धडे काढण्याची कल्पना पुढे आली, असं या कल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या राजेश बोडखे यांनी सांगितलं.
-
गावातल्या लोकांनी संकल्पना होकारार्थी माना डोलावल्या.
-
गावकऱ्यांचं एकमत झाल्याने शिक्षकांशी चर्चा करण्यात आली. भिंतीवर काय रेखाटायचं हे निश्चित करण्यात आलं, असं बोडखे म्हणाले.
-
हे सगळं ठरल्यानंतर रंगकाम करता येणारे गावातील काही पेंटर पुढे आले. आणि नंतर भिंती रंगवण्याचं काम सुरू झालं.
-
सामाजिक भान जपत या सगळ्या कामासाठी येणारा दीड लाखांचा खर्च स्वतः बोडखेंनी उचलला.
-
प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोणकोणते धडे रेखाटायचे हे निश्चित झाल्यानंतर कामाला सुरूवात झाली.
-
कुठे गणिताचे पाढे, तर कुठे भुगोलाचे धडे… संपूर्ण गावातील भिंती ज्ञानदानाचे फळे झाल्या.
-
गणिताची सूत्र, विज्ञानाचे धडे, भूगोलाचे नकाशे, ते मराठी आणि इंग्रजी महिने सुद्धा भिंतीवर रेखाटण्यात आले. विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करता यावं म्हणून गावाचीच शाळा करण्यात आली.
-
भोर तालुक्यातील म्हाळवाडी गावानं नेटवर्कवर मात करत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा वेगळ्या मार्गाने प्रयत्न सुरू केला आहे.
-
-
त्यामुळे गावकऱ्यांचं कौतूकाबरोबर गावाचंही नाव निघत आहे.

Ajit Pawar: अजित पवार आणि अंजना कृष्णा प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “खूप वेळा…”