-
राज्यात सध्या ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांचं नाव चर्चेत आहे. बंडातात्या यांनी सुपरमार्केटमधील वाइन विक्रीच्या निर्णयाला विरोध करताना सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांच्यासह इतर काही नेत्यांचा उल्लेख करत आक्षेपार्ह विधान करत आरोप केले आहेत. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यातही घेतलं. पण यानिमित्ताने त्यांचं नाव चर्चेत आहे. यानिमित्ताने बंडातात्या कराडकर नेमके कोण आहेत हे जाणून घेऊयात…
-
हभप बंडातात्या कराडकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ कीर्तनकार आहेत.
-
तसंच ते समाज प्रबोधनकारही आहेत.
-
तरुणांना इतिहास माहित व्हावा यासाठी ते गडकोटांवर प्रतापी संस्कार सोहळ्याचं आयोजन करतात. १९९७ पासून त्यांनी याची सुरुवात केली.
-
बंडातात्या कराडकरे यांनी १९९६ मध्ये व्यसनमुक्त युवक संघाची स्थापना केली. व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांना व्यसनमुक्त करण्याचं का ही संस्था करते.
-
व्यसनमुक्ती करतानाच त्यांनी गुरुवर्य भगवान मामा कराडकर शिक्षण संस्थेची स्थापना केली. सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये ही संस्था कार्यरत आहे. या शिक्षण संस्थेतून गुरुकूल पद्धतीने शिक्षण दिलं जातं.
-
विशेष म्हणजे राज्यातील पहिली वारकरी शिक्षण देणारी ही शाळा आहे.
-
२०१९ मध्ये पद्मश्री पुरस्कारासाठी राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यासाठी बंडातात्या कराडकरांकडून त्यांची माहिती मागवली होती. पण आपण कोणतााही पुरस्कार स्वीकारत नाही, असं सांगत त्यांनी स्वत:च्या कार्याची माहिती देण्यास नकार दिला होता.
-
याआधी राज्य सरकारचा आदेश झुगारून पंढरपूरच्या दिशेने पायी निघाल्याने बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी अटक केली होती. वारकरी आळंदी पंढरपूर चालत येणारच, असा एल्गार बंडातात्यांनी केला होता. तसंच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसाठी आंदोलन करण्याचा त्यांनी इशारा दिला होता.
-
राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार होतं असताना आणि पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी गो हत्या बंदी कायदा लागू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा रोखण्याचा इशारा दिला होता. गोहत्या बंदी कायद्यासाठी त्यांनी चक्क मुख्यमंत्र्यांना अडवलं होतं.
-
महाराष्ट्र सरकारने लॉकडाउन काळात मंदिरे खुली न केल्यामुळे बंडातात्यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. त्यांनी एक पत्रं लिहून सरकारचा निषेध म्हणून यंदा दिवाळी साजरी करू नका, असं आवाहनही केलं होतं.
-
दरम्यान त्यांच्या वक्तव्यावरुन सध्या महाराष्ट्रात नवा वाद निर्माण झाला आहे. बंडातात्या कराडकर यांनी यावेळी नेत्यांची मुलं दारुच्या आहारी गेल्याचं सांगत काहीजणांची नावंदेखील घेतली. पतंगराव कदम यांच्या मुलाचं निधन कसं झालं होतं विचारा? असंही ते पत्रकारांना म्हणाले. तसंच सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांच्या नावाचाही उल्लेख केला. कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारु पित नाही त्याचं नाव सांगा असं आव्हानच त्यांनी पत्रकारांना दिलं. तसंच आपण नावं घेतली आहेत त्यांनी पुरावा मागितलं तर सिद्ध करु शकतो असंही म्हणाले. सुप्रिया सुळेंनी बंडातात्या खोटं बोलत आहेत सांगावं असं आव्हानही त्यांनी दिलं.
-
यासाठी त्यांनी माफीदेखील मागितली आहे. “माझ्या वक्तव्यानं भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो असं म्हणत बंडातात्या कराडकर यांनी वादावर पडता टाकण्याचा प्रयत्न केला. मी काही आरोप केले आहेत, ते आरोप पूर्वग्रहदूषित नाही. चारही लोकांची मी क्षमा मागतो. पंकजा आणि सुप्रिया या दोघींचंही वर्तन चांगलं आहे. त्या दोघीही निर्व्यसनी आणि सदाचारी आहेत, असं मी कबूल करतो,” असं बंडातात्या म्हणाले आहेत.
-
बाळासाहेबांबरोबरच काही राजकीय लोकांची नावे घेतली. त्यांच्याबद्दल मला कुठलाही वैयक्तिक पूर्वआकस नाही. मी वैयक्तिक त्यांचा कधीही द्वेष करत नाही. त्यांच्याबद्दल मी याठिकाणी माफी मागतो. माझी विधाने अनावधानामधून आली आहेच. त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करत आहे, असंही बंडातात्या कराडकर म्हणाले आहेत.
-
५० वर्षाच्या जीवनात माझं वैयक्तिक चारित्र्य प्रतिष्ठेचा विषय कधीच केला नाही. काही माणसं मर्यादेचं उल्लंघन करून माझ्यावर आरोप करत असतील. पण, माझ्या जीवनाची मला खात्री आहे. माझ्यावर अनेक आरोप आहेत. पण, मी ते माझ्या प्रतिष्ठेचं कारण समजत नाही, असंही बंडातात्या म्हणाले. काही लोक मी आरएसएसचा कार्यकर्ता असल्याचा आरोप करतात. पण, मी कुठल्याही संघटनेचा कार्यकर्ता नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.
-
(File Photos)

अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; महिलांनो, ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते कॅन्सरची सुरुवात, धोका होण्याआधी…