-
विकेण्ड आला की अनेकदा कुठेतरी भटकंतीला जाण्यासाठी प्लॅनिंग सुरु होते. मात्र कमी वेळ आणि हाती असलेले कमी दिवस यामुळे मुंबईकरांना अनेकदा पुणे किंवा आजूबाजूच्या परिसरामध्येच खास करुन लोणावळा आणि खंडाळ्यालाच जाता येते. मात्र या फोटो गॅलरीमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत मुंबई आणि पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेले काही हटके जागांबद्दल. चला तर मग गेट सेट गो…
-
तारकर्ली बीच – पिकनिकची वेगवेगळी ठिकाणे तुम्ही सर्च करत असाल तर तारकर्ली बीच उत्तम ठिकाण आहे. नारळी पोफळीच्या बागा, बांबू- सुपारीची झाडे, मऊ-पांढरी शुभ्र वाळू आणि अथांग पसरलेला सागर मनमोहून टाकणारे तारकर्ली समुद्र किनाऱ्याचे हे सौंदर्य निश्चित तुमच्या मनाला भुरळ पाडेल. इथल्या मऊ वाळूत पावले टाकताना मनाला एक प्रसन्नता तर मिळतेच पण त्याचबरोबर तुम्ही इथे बोट राईड, वॉटर स्पोटर्सचाही आनंद लुटू शकता. स्पीड बोट, पॅराग्लायडिंग, स्कूबा डायव्हिंगचीही व्यवस्था आहे. मुंबईपासून अंतर – अंदाजे ५३३ किलोमीटर पुण्यापासून अंतर – अंदाजे ३९० किलोमीटर ट्रेनने सर्वात जवळचे स्टेशन – कुडाळ सर्वोत्तम वेळ – ऑक्टोबर ते मार्च दरम्यान कधीही
-
सुला वाइन यार्ड्स, नाशिक देठाइतक्या दांडीने पेललेल्या काचेच्या चषकात निम्म्यावर हिंदूकाळणाऱ्या रक्तवर्णीय वाइनचे दोन घुटकेही क्षणार्धात चित्तलहरींना उल्हसित करतात. त्यातच तिला बोचणारी थंडी, समोर पेटवलेली शेकोटी आणि तरल संगीताने भारलेल्या वातावरणाची जोड मिळाली तर..! बेधुंद करणारं हे ‘थ्रिल’ अनुभवयाचं असेल तर नाशिकच्या ‘सुला वाइन यार्ड्स’ला भेट द्यायलाच हवी. देशाची वाइन राजधानी म्हणून ओळख निर्माण करणारा नाशिकमधील वाइन महोत्सव देशातील नव्हे तर, परदेशातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो हा फेस्टीव्हल सामान्यपणे फेब्रुवारी महिन्यामध्ये असतो. नाशिकमध्ये वाइनरीजची संख्या ४०च्या आसपास आहे. मुंबईपासून अंतर – अंदाजे १७० किलोमीटर पुण्यापासून अंतर – अंदाजे २२४ किलोमीटर सर्वोत्तम वेळ – जानेवारी ते मार्च दरम्यान कधीही
-
लवासा, पुणे पुणे जिल्ह्य़ातील मुळशी व वेल्हे या तालुक्यांतील १८ गावांच्या परिसरात पाच टप्प्यात ‘लवासा’ प्रकल्प आहे. भटकंतीबरोबरच वन डे लाँग ड्राइव्हसाठीही लवासा चांगला पर्याय आहे. मुंबईपासून अंतर – अंदाजे १८७ किलोमीटर पुण्यापासून अंतर – अंदाजे ५८ किलोमीटर सर्वोत्तम वेळ – वर्षभरात कधीही
-
आंबोली, सिंधुदूर्ग कोकणचे प्रतिमहाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या आंबोली दक्षिण कोकणचे प्रसिद्ध थंड हवेचे स्थळ म्हणून ओळखली जाते. जागतिक नकाशावर पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र म्हणूनही आंबोलीची स्वतंत्र ओळख आहे. आंबोली हिरण्यकेशी तीर्थस्थान प्रसिद्ध असून ही नदी पूर्व दिशेने वाहत कर्नाटक राज्यात जाते. या ठिकाणी ४०० प्रकारच्या औषधी वनस्पती, पशुपक्षी, दुर्मीळ साप व बेडूक सापडतात. जंगल पर्यटनासाठी पर्यटक मोठय़ा प्रमाणात येतात. तसेच महादेव गड पॉइंट, कावळेसाद पॉइंट, शिरगांवकर पॉइंट अशी पर्यटकांची गर्दी होणारी स्थळेदेखील आहेत. मुंबईपासून अंतर – अंदाजे ४६७ किलोमीटर पुण्यापासून अंतर – अंदाजे ३४५ किलोमीटर ट्रेनने सर्वात जवळचे स्टेशन – सावंतवाडी सर्वोत्तम वेळ – डिसेंबर ते मार्चमध्ये कधीही
-

गायक राहुल देशपांडेंचा घटस्फोट, १७ वर्षांच्या संसारानंतर पत्नीपासून विभक्त