-
वर्धा जिल्ह्यातील दारोडा गावासाठी सोमवारची सकाळ भूकंपाच्या धक्क्यासारखी ठरली. दारोडा गावची प्राध्यापक लेक हिंगणघाट येथे महाविद्यालयात जात असताना आरोपीनं तिला जिवंत जाळलं. आगीनं होरपळलेल्या पीडितेचा सोमवारी उगवत्या सूर्याबरोबरच श्वास तुटला. या घटनेनं अवघ्या महाराष्ट्राचं काळीज हळहळलं. या घटनेनं राजकीय नेते आणि अभिनेतेही या घटनेनं सुन्न झाले. या घटनेनंतर पीडितेच्या पित्यासह कोण काय म्हणालं…
-
“माझ्या मुलीला जसा त्रास झाला, तसाच त्रास आरोपीला झाला पाहिजे. त्यालाही जिवंत जाळलं पाहिजे. त्याला जनतेसमोर आणलं पाहिजे. इतकचं मी यावेळी सांगू शकतो. या प्रकरणाची तातडीने सुनावणी घेण्यात यावी. लवकरात लवकर या खटल्याचा निर्णय लावा, नाहीतर आरोपीला आमच्या स्वाधीन करा,” अशी मागणी पीडितेच्या वडिलांनी केली.
-
“हिंगणघाट जळीतकांडातील भगिणीच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी ऐकून खूप हळहळ वाटत आहे. एक सात्विक संताप देखील होत आहे की, कुठलंही कारण नसताना अशा पद्धतीनं एखाद्याला जीव द्यावा लागतोय. ही समाजासाठी फार दुर्दैवाची गोष्ट आहे. केंद्र सरकार आणि न्यायव्यवस्थेला हात जोडून विनंती आहे की, अशा प्रकरणांचा लवकरात लवकर छडा लावून आरोपींना कडक शासन होणे गरजेचे आहे. निर्भयाचे बलात्कारी अजूनही फासावर चढलेले नाहीत. तारखांवर तारखा पडत चाललेल्या आहेत. एकंदरीतच अशा पद्धतीच्या घटनांमध्ये वाढ होणे हे समाजाला चिंतीत करणारे आहे. या आरोपींना तात्काळ शासन व्हावं असं नागरिक म्हणून फार मनापासून वाटतं. हैदराबाद पोलिसांनी केलेल्या कारवाईचं समर्थन करण्याची वेळ नागरिकांवर येऊ नये हीच न्याय व्यवस्थेला आणि केंद्र शासनाला हात जोडून विनंती,” अशी भावना अभिनेते मकरंद अनासपुरे व्यक्त केली आहे.
-
“आरोपीला कोणताही दया माया दाखवली जाणार नाही. या सगळ्याचा सरकार पाठपुरावा करेल. अनेकदा अशा प्रकरणांची न्यायालयात बराच वेळ सुनावणी सुरु असते. निकाल लागला, तरी शिक्षा होण्यास वेळ लागतो. तसं या बाबतीत घडू देणार नाही. लवकरात लवकर गुन्हा सिद्ध करुन आरोपीला फासावर लटकवू. अशा पद्धतीचं कृत्य करण्याची हिंमत होणार नाही असा कायदा करु," असं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
-
"हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा आज दुदैवी मृत्यू झाला. ही अत्यंत दु:खद बाब आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याच्या दिशेने सरकारी वकील उज्ज्वल निकल काम करत आहेत. उज्ज्वल निकम आणि मी तेथील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. सरकारतर्फे पीडितेला वाचवण्याचे सर्व प्रयत्न झाले. नागपूर तसेच मुंबईतील डॉक्टरांनी देखील सर्व प्रयत्न केले. मात्र दुदैवाने पीडितेला वाचवण्यात अपयश आले. या दु:खद प्रसंगी राज्य सरकार पीडित कुटुंबांच्या पाठीशी उभे आहे. जी आश्वासने दिली आहेत, ती राज्य सरकार पूर्ण करेल," राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घटनेनंतर सांगितलं.
-
“हिंगणघाटमधील दुर्दैवी घटनेतील पीडितेला अखेर आपल्या प्राणाला मुकावे लागले. तिच्या कुटुंबियांना या दु:खातून सावरण्यासाठी शक्ती मिळावी, यासाठी मी प्रार्थना करतो. ती आपल्यातून निघून गेली असली तरी तिच्या मारेकर्याला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी. पुन्हा कोणत्या युवतीला अशा दुर्दैवी प्रसंगाला सामोरे जावे लागणार नाही, अशी अद्दल त्याला घडली पाहिजे, अशी मागणी राज्य सरकारकडे आहे.” असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
-
“अतिशय दुःखद..! हिंगणघाट प्रकरणातील युवतीचा मृत्यू झाला. या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात होतेय. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारनं ठोस पावलं उचलावी ही विनंती. या मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली. तिच्या कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. तरुणीला आरोपीनं जाळण्याचा प्रयत्न केला. त्यात पीडितेचा मृत्यू झाला. पण हा मृत्यू नाही, तर हत्या आहे.,” अशी चीड खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.
-
“धक्कादायक, संतापजनक घटनेची अखेर अत्यंत वेदनादायी झाली. वर्धा जळीतकांडांतील पीडितेचा दुर्दैवी मृत्यू हा विकृतीचा बळी ठरला आहे. पीडितेच्या आत्म्यास शांती लाभावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पण समाजातील विकृतीची राख करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू हिच पीडितेला खरी श्रद्धांजली ठरेल,” असं आवाहन आमदार रोहित पवार यांनी केलं आहे.
-
“आरोपीला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा लवकरच मिळेल. पण आपल्या घरात असा नराधम निर्माण होऊ न देणे हीच हिंगणघाट हल्ल्यातील मृत बहिणीला आपली आदरांजली असेल. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ न देण्यासाठी सरकार यापुढे अधिक संवेदनशील व गुन्हेगारांच्या विरोधात कठोरपणे काम करेल. समाजानेही महिलांच्या सन्मानाप्रती जागरूक राहिलं पाहिजे. या घटनेतील आरोपीला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा लवकरच मिळेल आणि ती इतरांवर जरब बसवणारी असेल. मी तिच्या कुटुंबियांच्या आणि हिंगणघाटवसियांच्या दुःखात सहभागी आहे," असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
-
अतिशय दुःखद घटना! हिंगणघाट घटनेतील पीडित युवतीचा आज सकाळी उपचारादम्यान नागपूर येथे मृत्यु झाला. तिच्या आत्म्याला शांती मिळो व परमेश्वर तिच्या परिवाराला दुःख सहन करण्याची ताकद देवो हीच प्रार्थना..!! भावपूर्ण श्रद्धांजली..!!," अशा शब्दात वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांनी शोक व्यक्त केला आहे.
-
हिंगणघाट जळतकांडातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली हे अत्यंत दुर्दैवी आहे. क्रूरतेला महाराष्ट्रात थारा नाही हे लक्षात ठेवावे. पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी सरकार कटिबद्ध आहे. या पुरोगामी महाराष्ट्रात समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत याचा गांभीर्याने विचार करायला हवा," असा उद्विग्न सवाल राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केला आहे.
-
"माझ्यातली आई आज सुन्न, नि:शब्द झालीय… महाराष्ट्राच्या लेकीचा जीवनाशी संघर्ष संपला. आपण या ‘हिंसक-पुरुषी’ मानसिकतेशी संघर्ष सुरू करूया," असं आवाहन राज्याच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलं आहे.
-
"हिंगणघाटमधील पीडित युवतीची आज मृत्यूशी झुंज अखेर संपली. ज्या नराधमाने हिंगणघाटमधील युवतीवर ही वेळ आणली त्याला कडक शासन होईल. या क्रूर मानसिकतेला अद्दल घडवण्याची गरज आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधमावर सरकारकडून त्वरित आणि कठोर कारवाई होईल याची मला खात्री आहे. हिंगणघाट येथे घडलेल्या घटनेमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या भावनांचा उद्रेक झाला आहे. सरकार व न्याय व्यवस्था मिळून दोषींना कठोरातकठोर शिक्षा करणार मात्र जनतेने शांतता राखावी आणि सरकारला सहकार्य करावे ही विनंती," असं आवाहन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलं आहे.
-
"हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेच्या मृत्यूची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. या कठीण प्रसंगी राज्य सरकार आणि काँग्रेस पक्ष पीडित कुटुंबियांच्या सोबत आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!," अशा शब्दात राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शोक व्यक्त केला.
-
“अशा प्रकारच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. कितीही कठोर कायदा केला तर त्याचा काही फरक पडत नाही असं दिसतंय. समाजातील पुरुषी मानसिकता ही ‘नाही’ म्हणणाऱ्या स्त्रियांना मानतच नाही. या घटनांना आळा कसा घालायचा हेही कळेनासं झालं आहे. कारण छोट्या घटनांची जेव्हा तक्रार केली जाते तेव्हा महिलांची गंभीरपणे दखल घेतली जात नाही. एखादा मुलगा माझा पाठलाग करतोय अशी तक्रार जर महिलेनं पोलिसांकडे केली तर त्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. पण अशा घटनांची ही पहिली पायरी आहे,” अशी चिंता अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी व्यक्त केली.
-
"हिंगणघाटमधील पीडितेचा आज दुर्दैवी अंत झाल्याची बातमी ऐकून मन अतिशय उदास झालं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात महिलांची ही स्थिती पाहून मन अतिशय अस्वस्थ होतंय. मा. मुख्यमंत्री उद्धवजींनी गृहखात्यामध्ये लक्ष घालून, महिलांवरील वाढत्या आत्याचारांच्या घटनांवर नियंत्रण आणावं," अशी विनंती भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल देशाचे नवे उपराष्ट्रपती; सी. पी. राधाकृष्णन यांचा बी. सुदर्शन रेड्डी यांच्यावर विजय