-
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी मूळचा झारखंडचा आहे. आता त्याचा उतरता काळ सुरु आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याला फारशी चमकदार कामगिरी करुन दाखवता आलेले नाही. पण झारखंड सारख्या छोटया राज्यातून आलेल्या धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक वेगळी ओळख, स्वत:चे आदराचे स्थान निर्माण केले.
-
आता झारखंडकडून खेळणारा आणखी एक युवा खेळाडू भविष्यात धोनीप्रमाणे या राज्याचे नाव उज्वल करु शकतो. (सर्व फोटो सौजन्य – इशान किशन इन्स्टाग्राम)
-
त्याचे नाव आहे इशान किशन. धोनीप्रमाणे तो सुद्धा यष्टीरक्षण करतो. डावखुरी फलंदाजी करणारा इशान किशन धोनीप्रमाणे चौफेर फटकेबाजी करु शकतो.
-
बिहार पाटण्यामध्ये जन्मलेला इशान झारखंडकडून खेळतो. २०१६ साली त्याची भारताच्या अंडर-१९ वर्ल्डकसाठी निवडलेल्या संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली. इशान आता फक्त २२ वर्षांचा आहे.
-
इशानच्या कोचनी दिलेल्या माहितीनुसार, एम एस धोनी आणि अॅडम गिलख्रिस्ट त्याचे आदर्श आहेत.
-
२०१६-१७ च्या रणजी हंगामात इशानने दिल्ली सारख्या बलाढय संघाविरुद्ध २७३ धावांची खेळी केली होती. रणजी करंडक स्पर्धेत झारखंडच्या खेळाडूची ही आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे. देशातंर्गत स्पर्धेत खोऱ्याने धावा केल्यामुळे आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स सारख्या संघाने त्याला विकत घेतले.
-
मुंबई इंडियन्सचा इशान किशन यंदाचा आयपीएलचा हंगाम गाजवतोय. त्याच्या बॅटमधून होणारी चौकार, षटकाराची आतषबाजी डोळयाचे पारणे फेडणारी असते.
-
यंदाच्या आयपीएलच्या हंगामात त्याने १३ सामन्यात ४८३ धावा फटकावल्या आहेत. षटकारांमध्येही तो आघाडीवर आहे. त्याने आतापर्यंत २९ षटकार खेचले आहेत. RCB विरुद्धच्या एका सामन्यात त्याने फलंदाजी करताना ५८ चेंडूत ९ षटकारांसह ९९ धावा केल्या. पण सामना बरोबरीत सुटल्यावर सुपर ओव्हरमध्ये मात्र मुंबईचा संघ पराभूत झाला. इशानच्या फलंदाजीमुळे हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.
-
२०१८ मध्ये झालेल्या आयपीएलच्या लिलावात इशान किशनला मुंबई इंडियन्सने ६.२ कोटी रुपयांना विकत घेतले होते.
-
मागच्या दोन हंगामांपेक्षा या हंगामात इशान किशन जास्त प्रभावी ठरला आहे. यंदाच्या हंगामात संघाला गरज असताना त्याने तडाखेबंद फलंदाजी केली आहे. . इशान किशन आता अवघ्या २२ वर्षांचा आहे. उद्या भारतीय संघात संधी मिळाल्यास तो सुद्धा धोनी प्रमाणे झारखंडचे नाव उज्वल करु शकतो.

सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींचं दार; १२ महिन्यांनंतर भद्र महापुरुष राजयोगानं संपत्तीत होणार प्रचंड वाढ