पहिल्या गड्यासाठी भारताच्या चार फलंदाजांची ४०८ धावांची भागीदारी! आठवला का तो सामना? बांगलादेशविरुद्धच्या त्या कसोटी सामन्याला आज १४ वर्षांचा काळ लोटला आहे. २५ मे २००७रोजी ढाकामध्ये हा ऐतिहासिक सामना रंगला होता. यात टीम इंडियाच्या आघाडीच्या चारही फलंदाजांनी शतके झळकावली. स्फोटक वीरेंद्र सेहवागला आराम देत दिनेश कार्तिक आणि वसीम जाफर यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. १७५ धावा फलकावर लावल्यानंतर कार्तिकला दुखापत झाली आणि त्याने मैदान सोडले. यानंतर द्रविड मैदानात आला. भारताची थांबलेली गाडी द्रविड-जाफरने २८१ धावांपर्यंत पोहोचवली. यादरम्यान जाफरने आपला शतकी पल्ला ओलांडला, मात्र १३८ धावांवर तोसुद्धा कार्तिकसारखा रिटायर्ड हर्ट झाला. त्याने आपल्या खेळीत १७ चौकार लगावले. यानंतर राहुल द्रविड आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने बांगलादेशच्या गोलंदाजांची पिसे काढली. या दोघांनी भारताला ४०० पार पोहोचवले. द्रविडनेही आपले शतक पूर्ण केले. मात्र, शतकांनंतर तो बाद झाला. ही भारताची पहिली विकेट होती. आघाडीच्या चार फलंदाजांनी पहिल्या गड्यासाठी ४०८ धावांची भागीदारी उभारली. द्रविडनंतर विश्रांती घेऊन आलेल्या कार्तिकने शतक पूर्ण केले आणि १२९ धावांवर माघारी परतला. त्याने १६ चौकार लगावले. सचिननेही आपले शतक पूर्ण करत ८ चौकारांसह १२२ धावा केल्या. नाणेफेक जिंकलेल्या भारताने प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशला नामोहरम करत ३ बाद ६१० धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशला दोन्ही डावात हे लक्ष्य झेपले नाही आणि टीम इंडियाने १ डाव आणि १२९ धावांनी हा सामना खिशात टाकला.

२० वर्षांचा अनुभव असणाऱ्या कर्मचाऱ्याला कंपनीने नोकरीवरून काढले; कर्मचारी म्हणाला, ‘अनेक वर्षांपासून खूप पैसे…’