-
लंडन ऑलिम्पिकचा रेकॉर्ड मोडत भारताने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी केली. पी. व्ही. सिंधू, लव्हलिना बोर्गोहेन आणि मिराबाई चानू या महिला खेळाडूंनी पदकाची कमाई करत भारताचे नाव उंचावले.
१२५ वर्षांच्या ऑलिम्पिक इतिहासात भारताच्या महिला खेळाडूंनी केलेली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी कधीही तीन भारतीय महिला खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकली नव्हती. (फोटो सौजन्य : Reuters) -
भारताची स्टार महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. मीराबाईने ४९ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले आहे.
-
भारतीय वेटलिफ्टिंगच्या इतिहासातील ऑलिम्पिकमधील हे भारताचे दुसरे पदक आहे. सिडनी ऑलिम्पिक (२०००) मध्ये भारताने यापूर्वी वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकले होते. कर्णम मल्लेश्वरीने हे पदक भारताला मिळवून दिले होते. ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी मीराबाई चानू ही पहिली भारतीय वेटलिफ्टर आहे.
-
मिराबाई चानू सैखोम हिने ऑलिम्पिक रौप्यपदकाला गवसणी घालताना ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या कर्णम मल्लेश्वरीचा वारसा २१ वर्षांनंतर चालवला. १९९४ आणि ९५मध्ये मल्लेश्वरीने जागतिक अजिंक्यपद वेटलिफ्टिंग स्पर्धेत सलग दोनदा सुवर्णपदक जिंकण्याची किमया साधली होती. मिराबाईने २०१७ मध्ये जागतिक सुवर्णपदक पटकावत आशा उंचावल्या होत्या.
-
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये दिमाखात वाटचाल करणाऱ्या पी. व्ही. सिंधूने कांस्यपदक नावावर करत इतिहास रचला आहे. कांस्यपदकाच्या लढतीत सिंधूने चीनच्या ही बिंग जिआओचा २१-१३, २१-१५ असा पाडाव केला.
-
या विजयासह, ती ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे. सिंधूने २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले. तिच्या व्यतिरिक्त दिग्गज बॅडमिंटनपटू सायना नेहवालने लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले आहे.
बिंग जिआओविरुद्धच्या सामन्यात सिंधूने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ दाखवत पहिल्या गेममध्ये ११-८ अशी आघाडी घेतली. यानंतर १६-१०, १९-१२ अशी आघाडी टिकवली आणि पहिला गेम २१-१२ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्येही भारतीय शटलरने चांगली सुरुवात केली आणि ५-२ अशी आघाडी घेतली. पहिला गेम गमावल्यानंतर, बिंग जिआओ दबावाखाली असल्याचे दिसून आले. (फोटो सौजन्य : Reuters) -
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताची बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहेनने कांस्यपदक जिंकत नवा विक्रम रचला.
-
ईशान्य भारतामधील राज्यांमधून आलेली आणि ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावणारी लव्हलिना तिसरी महिला आहे. तसेच मेरी कोम आणि विजेंदर सिंग यांच्यानंतर बॉक्सिंगमध्ये पदक पटकावणारी ती तिसरी भारतीय खेळाडू ठरली आहे.
-
लव्हलिनाने कांस्यपदकावर आपले नाव कोरताना खास विक्रम केला. ऑलिम्पिकमध्ये लव्हलिना बॉक्सिंगमध्ये पदक पटकावणारी दुसरी भारतीय महिला ठरली आहे. याआधी मेरी कोमने ही कामगिरी केली आहे.
-
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील ऐतिहासिक कामगिरीच्या बळावर भारतीय पुरुष आणि महिला दोन्ही संघांनी जागतिक हॉकी क्रमवारीत प्रत्येकी एक स्थानाने आगेकूच केली आहे. पुरुष संघाने तिसरे आणि महिला संघाने आठवे स्थान गाठले आहे. पुरुष संघाने ४१ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवताना कांस्यपदक जिंकले, तर महिला संघाने चौथा क्रमांक मिळवला.
-
राणी रामपालच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या महिला संघाने उपांत्यपूर्व फेरीत बलाढ्य ऑस्ट्रेलियाला १-० असे पराभूत करून प्रथमच उपांत्य फेरीत धडक मारली. मात्र अर्जेंटिनाविरुद्ध २-१ असा पराभव पत्करल्यानंतर त्यांना शुक्रवारी कांस्यपदकाच्या लढतीत ब्रिटनविरुद्ध खेळावे लागले. भारतासाठी या लढतीत गुर्जित कौर (२५ आणि २६वे मिनिट) आणि वंदना कटारिया (२९ मि.) यांनी गोल केले. ब्रिटनकडून एलिना रायर (१६ मि.), सारा रॉबर्टसन (२४ मि.), हॉली वेब (३५ मि.) आणि ग्रेस बाल्सडन (४८ मि.) यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला.
-
२०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक कमावणाऱ्या ब्रिटनला भारताने कडवी झुंज दिली. ०-२ अशा पिछाडीवरून भारताने एकवेळ ३-२ अशी आघाडी मिळवली. परंतु प्रतिस्पर्ध्यांना असंख्य पेनल्टी कॉर्नर देणे आणि अखेरच्या सत्रातील सुरुवातीची पाच मिनिटे फक्त १० खेळाडूंसह खेळणे भारताला महागात पडले. त्यामुळे भारताला अथक प्रयत्नानंतरही बरोबरी साधण्यात अपयश आले आणि पंचांनी सामना संपल्याची शिटी वाजवताच भारताच्या प्रत्येक खेळाडूला हृदयभंगामुळे अश्रूंना आवरणे कठीण गेले.
करोनाच्या काळात आयोजित करण्यात आलेल्या टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धांची आज रविवारी सांगता झाली. भारताच्या खेळाडूंनी टोक्योत इतिहास रचला आणि आजपर्यंत सर्वाधिक पदके जिंकली. (फोटो सौजन्य : Reuters) -
अनेक खेळाडूंनी हसत, खेळत टोक्योचा निरोप घेतला. (सर्व फोटो सौजन्य : ट्विटर)

Anna Hazare : ‘अण्णा आता तरी उठा….’, पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले, “९० वर्षांनंतरही…”