-
टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धा सुरु होण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहे. येत्या २४ ऑगस्टपासून टोक्योमध्ये ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.
-
टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारतातील ५४ खेळाडू सहभागी होणार आहे. हे स्पर्धक विविध क्रीडा प्रकारात त्यांचे कौशल्य दाखवण्यास सज्ज झाले आहे.
-
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताने भालाफेकमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या नीरज चोप्राची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.
-
देवेंद्रने २०१६ च्या रिओ पॅरालिम्पिकमध्ये F46 प्रकारात ६३.९७ मीटर भालाफेक करुन विश्वविक्रम केला होता.
-
मात्र दुसरीकडे पॅरालिम्पिकमध्ये सलग दोनदा सुवर्णपदक मिळवणाऱ्या देवेंद्र झाझरिया याच्याकडून यंदाही पदकाची अपेक्षा केली जात आहे.
-
तर टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये देवेंद्रने ६५.७१ मीटर दूर भाला फेकून स्वतःचा विश्वविक्रम मोडत पुन्हा एक नवा विक्रम केला होता. त्यामुळे यंदाच्या पॅरालिम्पिकमध्ये देवेंद्रने देशवासियांच्या सुवर्णपदकाच्या आशा पल्लवित केल्या आहेत.
-
देवेंद्र झाझरिया हा राजस्थानमधील चुरू जिल्हय़ातील रहिवासी आहे.
-
देवेंद्रचा जन्म आपल्या साऱ्यांसारखाच. अगदी सुदृढ. लहान मुलांसारखा तोही मस्तीखोर होता. देवेंद्र आठ-नऊ वर्षांचा असेल. एकदा झाडावर चढताना एका उघड्या वायरला त्याचा हात लागला. त्या वायरमधून ११ हजार व्होल्टचा झटका त्याला लागला आणि तो खाली पडला. त्याचा जीव वाचेल की नाही, याचीही शाश्वती नव्हती.
-
पण या अपघातातून तो बचावला. शुद्धीवर आल्यावर त्याला आपला डावा हात अधू झाल्याचे समजले. हा विजेचा धक्का एवढा मोठा होता की त्याचा डावा हात अर्धा काढावा लागला.
-
हात गेल्याचे दु:ख होतेच, पण या दु:खात त्याने स्वत:ची आहुती दिली नाही. खेळांची त्याला आवड होती. भालाफेकसारखा हातावर अवलंबून असलेला खेळ खेळण्यास त्याने सुरुवात केली. एक हात नसताना आता याच खेळात कारकीर्द करण्याचा त्याने संकल्प केला.
-
खेळायला सुरुवात केल्यावर काही महिन्यांमध्ये त्याची कामगिरी चांगली होऊ लागली. जिल्हास्तरीय स्पर्धा त्याने जिंकली आणि आपण निवडलेला मार्ग चोख असल्याचे त्याला जाणवले.
-
स्पर्धासाठी विविध ठिकाणी जात असताना त्याला सुरुवातीला बऱ्याच गोष्टी सहन कराव्या लागल्या. कोणाच्या तरी वशिल्याने हा स्पर्धेला आल्याचे बोलले जायचे. देवेंद्र निमूटपणे सारे ऐकून घ्यायचा.
-
पण स्पर्धा झाल्यावर मात्र तीच हिणवणारी मंडळी देवेंद्रला चॅम्पियन म्हणत अभिनंदन करायला यायची. त्यामुळे लोकांच्या बोलण्याकडे त्याने कधीच लक्ष दिले नाही. आपल्या कामगिरीतूनच तो साऱ्या टीकाकारांना उत्तरे देत आला.
-
द्रोणाचार्य पुरस्कार विजेते रिपुदमनसिंग यांनी देवेंद्रमधील नैपुण्य हेरले. या मुलामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखविण्याची क्षमता आहे.
-
हे लक्षात आल्यानंतर त्यांनी १९९७ मध्ये देवेंद्रला मैदानी स्पर्धामधील क्रीडाप्रकारांचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यानंतर गुरू-शिष्यांची ही जोडी झकास जमली.
-
अवघ्या पाच वर्षांच्या सरावानंतर देवेंद्र याने २००२ मध्ये दक्षिण कोरियात झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सोनेरी कामगिरी केली. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही.
-
२००४ मध्ये अथेन्स येथे झालेल्या पॅरा ऑलिम्पिकमध्ये त्याने भालाफेकीत सुवर्णपदक पटकाविले. त्याने २०१६ मध्ये रिओ येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये त्याच कामगिरीची पुनरावृत्ती केली.
-
या दोन सुवर्णपदकांखेरीज त्याने अनेक आंतरराष्ट्रीय पदकांची लयलूट केली आहे, तसेच त्याने विश्वविक्रमांचीही नोंद केली आहे.
२००४ मध्ये त्याला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०१२मध्ये त्याला पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते. पद्मश्री पुरस्कार मिळवणारा तो पहिला पॅरालिम्पियनपटू ठरला होता. -
देशाच्या क्रीडा क्षेत्रातील राजीव गांधी खेलरत्न जो आता मेजर ध्यानचंद नावाने ओळखला जातो तो सर्वोच्च पुरस्कार त्याला २०१७ मध्ये देण्यात आला. हा मान मिळविणारा तो पहिलाच दिव्यांग खेळाडू ठरला होता.

भाजपाचा बालेकिल्ल्यातच पराभव, काँग्रेसचा दणदणीत विजय; नगरपालिकेवर कशी मिळवली सत्ता?