-
दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने (सीएसए) ‘ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर’ या वर्णद्वेषविरोधी मोहिमेला पाठिंबा दर्शवताना गुडघा टेकून बसण्याची कृती करणे सक्तीचे केल्यामुळे क्विंटन डीकॉकने मंगळवारी टी-२० विश्वचषकातील विंडीजविरुद्धच्या लढतीतून माघार घेतली.
-
डीकॉकच्या निर्णयाचा दक्षिण आफ्रिकेच्या संघ व्यस्थापनाला धक्का बसला असून त्यांच्या अहवालानंतर ‘सीएसए’ पुढील पावले उचलणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. या प्रकरणाची जागतिक क्रीडा जगतामध्ये चांगलीच चर्चा रंगलीय.
-
असं असतानाच आता क्विंटन डीकॉकने पहिल्यांदाच या घटनेबद्दल स्पष्टपणे भाष्य केलं आहे. क्विंटन डीकॉकने एका पत्रद्वारे आपली भूमिका मांडलीय. यामध्ये त्याने आपली आई कृष्णवर्णीय असल्याच्या मुद्द्यापासून, गरोदर पत्नीपर्यंत आणि लहानपणाच्या शिकवणीपासून आपण नकार का दिला यापर्यंत अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे. त्याने पत्रात काय म्हटलंय पाहुयात…
-
…तर मला ते करण्यात आनंदच आहे > “माझे संघ सहकारी आणि मायदेशातील चाहत्यांची मी माफी मागत मी माझं म्हणणं मांडू इच्छितो. मला कधीच माझ्या वागण्यामधून गोंधळ निर्माण करायचा नव्हता. आपण वर्णद्वेषाविरोधात बोललं पाहिजे आणि आपण इतरांसाठी उदाहरण म्हणून आदर्श समोर ठेवला पाहिजे हे मला समजतं,” असं तो म्हणालाय.
-
“जर मी गुडघ्यावर बसल्याने लोकांना शिकवण मिळत असेल आणि इतरांचं आयुष्य अधिक चांगलं होतं असेल तर मला ते करण्यात आनंदच आहे,” असं क्विंटन डीकॉकने पत्राची सुरुवात करताना म्हटलंय.
-
..तर मी त्यांची क्षमा मागतो > “वेस्ट इंडिजविरोधात सामना न खेळून मला कोणाचाही खास करुन वेस्ट इंडिज संघाचा कोणत्याही प्रकारे अपमान करायचा नव्हता. आम्ही सकाळी सामना खेळण्यासाठी मैदानावर जात असताना अचानक कोणाच्या तरी डोक्यात ही कल्पना आली,” असं क्विंटन डीकॉकने म्हटलं आहे.
-
“माझ्यामुळे कोणाला वाईट वाटलं असेल, गोंधळ झाला असेल, माझा राग आला असेल तर मी त्यांची क्षमा मागतो,” असंही क्विंटन डीकॉक म्हणाला आहे.
-
माझी बाजू मांडली पाहिजे… > पुढे ज्या प्रकरणावरुन मागील काही दिवसांपासून चर्चा सुरु होती त्याबद्दल क्विंटन डीकॉकने त्याची भूमिका स्पष्ट केलीय. “मी आतापर्यंत या महत्वाच्या विषयावर बोललो नाही. पण आता मला वाटतंय की माझी बाजू मांडली पाहिजे,” असं म्हणत त्याने आपली बाजू मांडलीय.
-
सर्वांचे हक्क हे तितकेच महत्वाचे आहेत… > “ज्यांना ठाऊक नाहीय त्यांना मी सांगू इच्छितो की मी स्वत: दोन वर्ण असलेल्या कुटुंबातील मुलगा आहे. माझ्या सावत्र बहिणी या श्वेतवर्णीय आहेत तर आई कृष्णवर्णीय. माझ्यासाठी माझ्या जन्मापासूनच कृष्णवर्णीयांचे जीव फार महत्वाचे आहेत,” असं तो म्हणालाय.
-
“केवळ एखादी आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोहीम सुरु झाल्याने मला कृष्णवर्णीयांच्या जीवाचं महत्व कळलंय असं नाहीय. कोणत्याही व्यक्तीपेक्षा लोकांचे अधिकार आणि समानता हे अधिक महत्वाचं आहे. आपल्या सर्वांना हक्क आहे आणि सर्वांचे हक्क हे तितकेच महत्वाचे आहेत, अशी शिकवण मला लहानपणापासून देण्यात आली आहे,” असं क्विंटन डीकॉकने पत्रात नमूद केलं आहे.
-
आधी आम्हाला सांगण्यात आलेलं की… >> “आम्हाला (समाना खेळण्यासाठी जाताना) जेव्हा सांगण्यात आलं की आम्ही काय करायचं आहे तेव्हा मला माझे हक्क काढून घेण्यात आल्यासारखं वाटलं. काल रात्री आमचं क्रिकेट बोर्डाशी चर्चा झाली, जी की फारच भावूक ठरली. मला वाटतं आम्हाला सर्वांना त्यांच्या हेतूबद्दलची कल्पना आलीय,” क्विंटन डीकॉकने म्हटलं आहे.
-
“मला वाटतं ही चर्चा आधी व्हायला हवी होती. जे सामन्याच्या दिवशी घडलं ते टाळता आलं असतं. मी आदर्श निर्माण केला पाहिजे मला ठाऊक आहे. आधी आम्हाला सांगण्यात आलेलं की तुम्हाला जे योग्य वाटेल ते करावं. मी माझे विचार माझ्यापुरतेच ठेवले. मी माझ्या कुटुंबासाठी आणि देशासाठी खेळणार होतो,” असं क्विंटन डीकॉक म्हणतो.
-
जर वर्णद्वेष करणाऱ्यांपैकी एक असतो… > “मला एक कळत नाही की मी हे एखाद्या गोष्टीमधून, कृतीमधून का दाखवून द्यायचं जर मी त्याच लोकांबरोबर रोज जगतोय, शिकतोय आणि त्यांच्यावर प्रेम करतोय. जेव्हा तुम्ही कोणतीही चर्चा न करता एखादी गोष्ट करायला सांगता तेव्हा त्याला काही अर्थ राहत नाही,” असं डीकॉक म्हणतो.
-
“मी स्वत: जर वर्णद्वेष करणाऱ्यांपैकी एक असतो तर मी गुडघ्यावर बसलो असतो आणि खोटारडेपणा करत भावना व्यक्त केल्या असत्या. मात्र हे चुकीचं ठरलं असतं कारण त्या कृतीने सुधारित समाज घडणार नाही. जे माझ्याबरोबर लहानाचे मोठे झाले आहेत, खेळले आहेत त्यांना माहितीय मी कसा आहे,” असं क्विंटन डीकॉक स्पष्ट करतो.
-
वर्णद्वेष करणारा म्हटल्याने आपल्याला फार त्रास झाल्याचं क्विंटन डीकॉकने पुढे म्हटलंय. “एक क्रिकेटर म्हणून माझ्याबद्दल बऱ्याच गोष्टी बोलल्या गेल्या. वेडा, बावळट, स्वार्थी, अपरिक्व असं बरंच काही मला बोललण्यात आलं. मात्र त्याचा मला त्रास झाला नाही,” असं डीकॉक म्हणलाय.
-
माझ्या कुटुंबाला, माझ्या गरोदर पत्नीला … > “मात्र गैरसमजूत झाल्यामुळे मला वर्णद्वेष करणारा बोलल्याने फार त्रास झाला. माझ्या कुटुंबाला, माझ्या गरोदर पत्नीला याचा त्रास झाला. मी वर्णद्वेष करणार नाहीय. मला हे चांगलं माहिती आहे. तसेच मला जे ओळखतात त्यांनाही माहितीय,” असं तो म्हणतो.
…तेव्हा मला धक्काच बसला > “मी शब्दांबरोबर फार चांगला खेळू शकत नाही मला माहितीय पण मी माझा सर्वोत्तम प्रयत्न केलाय की मी असं का वागलोय. सामना खेळण्यासाठी जाताना आम्हाला जेव्हा सांगण्यात आलं की तुम्हाला तिथे जाऊन सांगितल्याप्रमाणे करावं लागणार आहे तेव्हा मला धक्काच बसला. या वेळी आम्हाला ‘किंवा’चा पर्याय देण्यात आला नव्हता. मात्र हे असं वाटलेला मी एकटाच नव्हतो,” असं त्याने म्हटलं आहे. -
“आमचं प्रशिक्षण झालं, सराव शिबीरं झाली, झूम मिटींग झाल्या, आम्ही सर्व कुठे आणि कसे होतो आम्हाला ठाऊक होतं. आम्ही एकत्र होतो. मला माझ्या संघातील प्रत्येक खेळाडू प्रिय आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी क्रिकेट खेळण्यापेक्षा मला काहीही प्रिय नाहीय,” असं क्विंटन डीकॉकने सांगितलं.
-
“मालिका सुरु होण्याआधीच यासंदर्भात स्पष्टता आली असती तर अधिक चांगलं झालं असतं. तसं झालं असतं तर आम्ही आमच्या देशासाठी सामना जिंकण्याचं ध्येय समोर ठेऊन अधिक स्पष्टपणे खेळलो असतो. दरवेळेस आम्ही विश्वचषकासाठी जातो तेव्हा काहीतरी गोंधळ होतोच. हे योग्य नाहीय,” असं तो म्हणालाय.
-
लोकांच्या लक्षात आलं नसेल पण… > “मला माझ्या सर्व संघ सहकाऱ्यांचे आभार मानायचे आहेत, खास करुन माझा कर्णधार तेम्बा. लोकांच्या लक्षात आलं नसेल पण तेम्बा एक उत्तम नेतृत्व करणारा व्यक्ती आहे. जर त्याने, संघाने आणि दक्षिण आफ्रिकेने मला पुन्हा संधी दिली तर मला माझ्या देशासाठी क्रिकेट खेळण्याशिवाय इतर कोणतीही गोष्ट प्रिय नाही,” असं म्हणत क्विंटन डीकॉकने आता त्याला संघात पुन्हा घ्यायचं की नाही हा निर्णय सीएसएवर असल्याचं म्हटलं आहे.
-
सीएसएने काय म्हटलं होतं? > या प्रकरणानंतर ‘‘क्विंटन डीकॉकने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यापूर्वी गुडघा टेकून बसण्यास नकार देण्याचा वैयक्तिक निर्णय घेतला याची दक्षिण आफ्रिकन क्रिकेट मंडळाने दखल घेतली आहे,’’ अशी सीएसएने प्रतिक्रिया दिली होती.
-
‘सीएसए’ने त्यांच्या खेळाडूंना कृष्णवर्णीय नागरिकांची हत्या आणि अत्याचाराच्या विरोधातील मोहिमेला पाठिंबा दर्शवणे सक्तीचे केले. दक्षिण आफ्रिकेत पूर्वी कृष्णवर्णीयांचा क्रिकेटमध्येही समावेश केला जात नव्हता. मात्र, आता परिस्थितीत बदल झाल्याचा संदेश ‘सीएसए’ला द्यायचा आहे असल्याचं स्पष्ट होतं आहे.
-
कर्णधार बव्हूमाकडून समर्थन > डीकॉकने मंगळवारी उचललेल्या पावलाचे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तेम्बा बव्हूमाने समर्थन केले होते. सीएसएने सामन्याला सुरुवात होण्यास काही तास असताना अशाप्रकारचा निर्णय घेणे योग्य नव्हते, असे दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करणारा पहिला कृष्णवर्णीय खेळाडू बव्हूमा म्हणाला होता.
-
‘‘डीकॉक आमचा सहकारी आहे. त्यामुळे आम्ही त्याच्या पाठीशी आहोत. त्याला कोणताही संदेश द्यायचा झाल्यास आम्ही अंतर्गत चर्चा करू,’’ असे बव्हूमाने स्पष्ट केले होते. (सर्व फोटो इन्स्टाग्राम, ट्विटर, रॉयटर्सवरुन साभार)

२०२६ मध्ये जगावर मोठं संकट? बाबा वेंगा यांची सर्वात मोठी भविष्यवाणी! जे घडणार ते वाचून थरथर कापाल; जर हे खरं ठरलं तर…