-
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेक या क्रीडाप्रकारात सुवर्णपदक पटकावून इतिहास घडवणाऱ्या नीरज चोप्राने आज पुन्हा एकदा अनेकांची मनं जिंकली. नीरज नुकताच अहमदाबादमधल्या एका शाळेत गेला होता. तिथे त्याने शाळकरी मुलांसोबत काही वेळ घालवला, त्यांच्याशी बातचित केली.
-
त्याचबरोबर त्याने या चिमुकल्यांना भालाफेकही शिकवलं. त्याचबरोबर त्यांना खेळासंदर्भात, आरोग्यसंदर्भात मार्गदर्शनही केलं. या भेटीदरम्यानचा नीरज चोप्राचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.
-
नीरज चोप्राचा हा व्हिडीओ पाहून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा इम्प्रेस झाले आहेत. त्यांनीही हा व्हिडीओ शेअऱ करत नीरज चोप्राचं कौतुक केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणतात, मुलांमध्ये जाऊन त्यांना खेळ आणि आरोग्यप्रती जागृत करणं हे खूप चांगलं काम नीरज करत आहे. आपणही ही मोहीम पुढे अशीच चालू ठेवूया आणि मुलांना, युवकांना खेळण्यासाठी प्रेरित करुया.
-
पंतप्रधान मोदींनी हा व्हिडीओ रिट्वीट केला आहे. या व्हिडीओमध्ये नीरज चोप्रा लहान मुलांना भालाफेक शिकवताना दिसत आहे. हा व्हिडीओ अहमदाबादच्या संस्कारधाम इथला आहे.
-
तर दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये नीरज चोप्राने नेमबाजांची भेट घेतली. त्यानंतर त्याने नेमबाजीही केली. नीरजने इथं जमलेल्या सगळ्या लहान मुलांशी संवाद साधला आणि त्यांना प्रेरणा दिली.
-
संस्कारधाममधील मुलांची भेट घेतल्यानंतर नीरजनेही एक ट्वीट केलं आहे. यात त्याने लिहिलं आहे की, संस्कारधाममधल्या मुलांसोबत दिवस खूपच छान गेला. त्यांच्याशी खेळणं, बोलणं, त्यांना खेळ, व्यायाम, आहार आणि आरोग्याचं महत्त्व पटवून देता आलं, हे खूपच भारी वाटलं. शाळेत अभ्यासासोबत खेळालाही तितकंच महत्त्व दिलं जातं हे पाहून खूप छान वाटलं.
-
क्रीडा मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालयातर्फे मीट द चॅम्पियन हे नवं अभियान सुरू करण्यात आलं आहे. हे अभियान दोन वर्षे चालणार आहे. या अभियानांतर्गत जानेवारीपासून ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये यश मिळवलेले खेळाडू शाळांमध्ये जातील आणि तिथल्या मुलांशी संवाद साधतील. भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने साजरा केल्या जाणाऱ्या आझादीचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाअंतर्गतच हे अभियान राबवण्यात येत आहे. (फोटो सौजन्य – नीरज चोप्रा, संस्कारधाम ट्विटर)

सरकारचा मोठा निर्णय! हैदराबाद गॅझेट लागू करण्यास तत्वत: मंजुरी, माजी न्या. शिंदेंचा मनोज जरांगेंना शब्द