-
२०१९ वर्ष अनेक अर्थांनी खास ठरले. क्रिडा, मनोरंजन, राजकारण, समाजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये या वर्षी बऱ्याच घडामोडी घडल्या. इंटरनेटच्या श्रेत्रातही अनेक घडामोडी घडल्या. यामध्ये अगदी व्हायरल मिम्स असो किंवा रातोरात लोकप्रिय झालेल्या व्यक्ती यंदा इंटरनेटही चांगलेच चर्चेत राहिले. मात्र यावर्षी भारतीयांनी गुगलवर सर्वात जास्त कोणते प्रश्न सर्च केले हे आम्हाला ठाऊक आहे असं तुम्हाला सांगितल्यास आश्चर्य वाटेल. पण खरोखर गुगल ट्रेण्डच्या मदतीने 'What Is…' हा भारतीयांनी सर्वाधिक विचारलेला प्रश्न असल्याचे दिसून येत आहे. बर या 'What Is…'ने सुरु होणाऱ्या प्रश्नांमध्ये भारतीयांनी नक्की काय सर्च केलं हे जाणून घेऊयात.
-
What Is National Register Of Citizens Of India? – सध्या देशात सर्वाधिक चर्चेत असणारा प्रश्न म्हणजे 'नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स' म्हणजेच राष्ट्रीय नागरिक नोंदणी म्हणजेच एनसीआर. एनआरसी ही नवी किंवा अभिनव कल्पना नाही. १९५१ सालीच ती पहिल्यांदा मांडण्यात आली होती आणि सध्याची प्रक्रिया म्हणजे १९५१ च्या एनआरसीचे अद्ययावतीकरण करण्याचा प्रयत्न आहे असं मत याबद्दल बोलताना माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी व्यक्त केलं होतं. आसाममध्ये लागू करण्यात आलेले एनसीआर हे देशभरामध्ये लागू करण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळेच 'नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स' नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी नेटकऱ्यांनी गुगलची मदत घेतल्याचे दिसत आहे.
-
What Is Surgical Strike? – याच यादीमधील चित्रपटांशी संबंधित आणखीन एक प्रश्न म्हणजे What Is Surgical Strike?. अर्थात आता उरी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या ज्या सर्जिकल स्ट्राइकवर हा आधारित होता त्याच्याबद्दलच्या सर्चमध्ये वाढ होणे सहाजिक आहे. या चित्रपटाने तिकीटबारीवर जबरदस्त कामगिरी केली त्याचप्रमाणे सर्जिकल स्ट्राइकबद्दल जाणून घेण्यासाठी अनेकांनी गुगलची मदत घेतल्याचे दिसून आले.
-
What Is Article 15? – तुम्हाला ठाऊक आहे का कलम १५ काय आहे? अर्थात नसणारच पण तुम्ही आता याबद्दलची माहिती ज्या पद्धीतने गुगलवर शोधाल तसाच शोध लाखो भारतीयांनी घेतला आहे. पण कलम १५ चर्चेत येण्यामागील मुख्य कारण म्हणजे 'आर्टीकल १५' हा चित्रपट. उत्तर प्रदेशातील बदायूंमध्ये घडलेल्या बलात्कार प्रकरणावरुन प्रेरित असलेल्या ‘आर्टिकल १५’ या चित्रपटात आयुषमान खुराणाने प्रमुख भूमिका साकारली आहे. दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी जातिव्यवस्थेचे खरे वास्तव समोर ठेवत चित्रपटाच्या कथेमधून रोखठोक भाष्य केले आहे.
-
What Is The Ayodhya Case? – ९ नोव्हेंबर रोजी रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावरील सर्वोच्च न्यायालयातील ऐतिहासिक खटल्याचा निकाल लागला. अयोध्येतील २.७७ एकर वादग्रस्त जमीनीबद्दलच्या या खटल्याबद्दल मागील अनेक दशकांपासून न्यायलयीन वाद सुरु होता. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारण्यात यावे, तर मशिदीसाठी मोक्याच्या ठिकाणी पाच एकर जागा देण्यात येईल, असा निर्णय घटनापीठानं दिला. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर नेटकऱ्यांनी नक्की हा खटला आहे काय याबद्दल इंटरनेटवरुन माहिती मिळवली. त्यामुळेच What Is The Ayodhya Case? हा प्रश्न सर्वाधिक सर्च झालेल्या प्रश्नांच्या यादीमध्ये आहे.
-
What Is The DLS Method In Cricket? – भारतीय आणि क्रिकेट हे म्हणजे अतूट समिकरण आहे. यंदाच्या वर्षी एकदिवसीय क्रिकेटची विश्वचषक स्पर्धाही पार पडली. यामधून भारतीय संघ अनपेक्षितरित्या बाहेर फेकला गेला. या स्पर्धेबरोबरच २०१९ हे वर्ष भारतीय संघासाठी पूर्णपणे क्रिकेटमय गेलं. भारतीयांना भारतीय संघाच्याच नाही तर कोणत्याही क्रिकेट स्पर्धांबद्दल कायमच उत्सुकता असते. मात्र त्याचवेळी यंदा देशामध्ये पावसाळाही चांगला लांबला. देशातच काय तर इंग्लंडमध्येही विश्वचषक स्पर्धेदरम्यान चांगलाच पाऊस झाला. त्यातही भारत पाकिस्तान या हायवोल्टेज सामन्यावरही पावसाचे सावट होते. त्यामुळेच यंदा सर्वाधिक सर्च झालेल्या What is प्रकाराच्या प्रश्नांमध्ये क्रिकेटमधील डीएसएल म्हणजेच 'डकवर्थ-लुइस' म्हणजे काय याबद्दल भारतीयांनी गुगलवर मोठ्या प्रमाणात सर्च केल्याचे अढळले.
-
What Is E-Cigarette? – सप्टेंबर महिन्यामध्ये केंद्र सरकारने ई-सिगारेटचं उत्पादन आणि विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. धुम्रपानाची समस्या सोडवण्यात ई-सिगारेटला अपयश आलं असून, शाळकरी मुलांमध्ये त्याचे फॅड वाढले आहे. परिणामी, ई-सिगारेटचं उत्पादन, आयात-निर्यात, वाहतूक, विक्री, साठवणूक आणि जाहिरात या सगळ्यांवर बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १८ सप्टेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केली. मात्र थेट केंद्राचे बंदी घातलेली ई-सिगारेट म्हणजे काय? ती कशी हानीकारक आहे यासंदर्भात भारतीयांनी गुगलच्या मदतीने माहिती शोधली.
-
What Is Howdy Modi? – २१ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर या काळामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर होते. ह्यूस्टन येथे ‘टेक्सास इंडिया फोरम’कडून आज ऐतिहासिक ‘हाउडी मोदी’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नरेंद्र मोदींच्या या कार्यक्रमाला ५० हजारांपेक्षा अधिक अमेरिकी-भारतीय कार्यक्रमाला उपस्थित होते. हा अमेरिकेतील सर्वात मोठ्या कार्यक्रमांपैकी एक ठरला. मात्र हाऊडी मोदी म्हणजे नक्की काय आहे यासंदर्भात भारतीयांनी बरीच माहिती गुगलवर सर्च केली. हाऊडी हा शब्द हाऊ डू यू डू चा शॉर्टकट आहे. म्हणजेच मोदी कसे आहात तुम्ही असा या कार्यक्रमाच्या नावाचा शब्दश: अर्थ होतो.
-
What Is A Black Hole? – याच वर्षी एप्रिल महिन्यामध्ये विश्वातील कृष्णविवराची पहिली प्रतिमा मिळवण्यात वैज्ञानिकांना यश आले. गुरुत्वीय लहरींच्या शोधानंतर जागतिक पातळीवरील वैज्ञानिकांच्या सहकार्यातून ही अजोड कामगिरी साकार झाली. काळसर गाभा असलेल्या या कृष्णविवराभोवती पांढऱ्या तप्त वायूची नारिंगी ज्वाला व आयनद्रायु (प्लाझ्मा) या पहिल्याच प्रतिमेत दिसत आहे. कृष्णविवर दिसतच नाही तर त्याची प्रतिमा कुठून असणार अशा परिस्थितीत दुर्बिणींच्या माध्यमातून डिजिटल सादृशीकरण तंत्राने रेडिओ लहरींच्या मदतीने ही प्रतिमा तयार करण्याची कामगिरी साध्य करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीयांनी कृष्णविवर म्हणजेच ब्लॅक होल म्हणजे काय याबद्दल सर्च केल्याचे दिसून आले.
-
What Is Exit Poll? – यंदाचे वर्ष हे राजकीय घडामोडींचे ठरले. देशातील २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची जगभरामध्ये चर्चा झाली. या निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने २०१४ पेक्षा मोठे मताधिक्य मिळवत दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केली. याच निवडणुकाचा निकाल काय असेल याचे कल सांगणारे एक्झीट पोल म्हणजे काय हे नेटकऱ्यांनी गुगलवर शोधले. लोकसभा निवडणुकीबरोबर काही राज्यांच्या निवडणुका या वर्षी पार पडल्या त्या काळातही एक्झीट पोलबद्दलची उत्सुकता दिसून आली.
-
What Is Article 370? – ऑगस्ट महिन्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने राज्यघटनेतील अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतला. जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द करणे आणि जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. मात्र रद्द करण्यात आलेले हे कलम नक्की काय आहे याबद्दल भारतीयांनी सर्वाधिक सर्च केलं आहे.
-
आता या दहापैकी तुम्ही कोणता 'What Is…'ने सुरु होणारा प्रश्न शोधलाय सांगा पाहू.

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल