-
मुळचे अभियंता असलेले योगेश लेले माहिती तंत्रज्ञान कंपनीत कार्यरत आहेत. अमेरिकेतील ‘नॅशनल असोसिएशन ऑफ वॉच अँड क्लॉक कलेक्टर्स’ने केलेल्या त्यांच्या सन्मानामुळे ते चर्चेत आले आहेत. जुन्या घड्यांळांना नवजीवन देणाऱ्या पुण्यातील योगेश लेले यांच्या अनोख्या कौशल्याचा अमेरिकेत सन्मान झाला आहे. योगेश यांनी जुन्या घड्याळांच्या वैशिष्ट्यपूर्ण ‘डायल’ हुबेहूब नव्याने तयार केल्या असून, अमेरिकेतील एका प्रतिष्ठित प्रदर्शनामध्ये त्यांच्या डायलचे स्वतंत्र दालन करण्यात आले. (छायाचित्रं। लोकसत्ता)
-
अभियंता असलेल्या योगेश लेले यांना जुन्या दुचाकी, मोटार आणि घड्याळं यांचं आकर्षण आहे. इंटरनेटवरील माहिती आणि ध्वनिचित्रफिती पाहून गेल्या तीन वर्षांपासून त्यांनी जुन्या घड्याळांच्या डायल हुबेहूब तयार करण्याचे तंत्र त्यांनी शिकून घेतले. काही जुन्या घड्याळांच्या डायल कागदावर केलेल्या असतात. या डायल हातमागाच्या कागदावर, लाकडावर जशाच्या जशा साकारण्याचे कौशल्य योगेश यांनी मिळवले आहे. (छायाचित्रं। एएनआय)
-
सातत्याने प्रयोग करून १८९० पासूनच्या परदेशी बनावटीच्या अनेक दुर्मिळ घड्याळांना त्यांनी नवजीवन प्राप्त करून दिले आहे. त्यासाठी ते सॉफ्टवेअरचा, अतिनील किरण मुद्रण (युव्ही प्रिटिंग) अशा तंत्रांचा वापर करतात. ‘नॅशनल असोसिएशन ऑफ वॉच अँड क्लॉक कलेक्टर्स’ या संस्थेतर्फे अमेरिकेतील ओहोयो राज्यातील विल्मिंग्टन शहरात ३ ते ६ जून या दरम्यान झालेल्या प्रदर्शनामध्ये योगेश यांनी तयार केलेल्या डायल मांडण्यात आल्या. (छायाचित्रं। एएनआय)
-
घड्याळांना नवजीवन देण्याचे कौशल्य आणि अमेरिकेत मिळालेल्या सन्मानाबद्दल योगेश लेले यांनी माहिती दिली. ‘जुन्या घड्याळांची आवड असल्याने गेली तीन वर्षे दुरुस्ती, डायल तयार करणे यांबाबतचा अभ्यास सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी नव्याने केलेल्या डायलची छायाचित्रे समाजमाध्यमांत पोस्ट केली होती. ती छायाचित्रे पाहून अमेरिकेतील नॅशनल असोसिएशन ऑफ वॉच अँड क्लॉक कलेक्टर्स या संस्थेचे सदस्य असलेल्या जो विल्कीन्स यांनी संपर्क साधला. त्यांनी त्यांच्याकडील एका जुन्या घड्याळांची डायल करण्याविषयी विचारणा केली. ते स्वत: घड्याळजी आहेत. त्यांनी त्यांच्याकडील जुन्या घड्याळाची डायल पाठवल्यावर काही दिवसांत त्यांना हुबेहूब डायल करून दिली," असं योगेश लेले म्हणाले. (छायाचित्रं। एएनआय)
-
"माझ्या कामगिरीने आनंदित होऊन त्यांनी माझ्या संग्रहाबाबत विचारणा करून तो मागवून घेतला. त्यानुसार त्यांना मी तो पाठवला. त्यानंतर त्यांनी प्रदर्शनात माझ्या डायलचे स्वतंत्र दालन करून मांडणी केली. ही संस्था विविध देशांमध्ये प्रदर्शने भरवते, त्यात लिलावही होतात. मनगटावरची घड्याळे, खिशात ठेवायची घड्याळे, भिंतीवरची घड्याळे, टेबलवरची घड्याळे प्रदर्शनात मांडली जातात. ही संस्था जगभरात प्रतिष्ठित मानली जाते, विविध देशांमध्ये त्यांचे १३ हजारहून अधिक सदस्य आहेत," असे योगेश यांनी सांगितले. (छायाचित्रं। एएनआय)

Pune Fort : पुण्यातील सिंहगडावरुन बेपत्ता झालेल्या तरुणाचा पाच दिवसांनी लागला शोध, प्रकरणातला ट्विस्ट कायम