-
सुमारे वर्षभर शेतकरी आंदोलनामुळे देशभरात एक ठिकाण चर्चेत आहे ते म्हणजे हरियाणा-दिल्लीमधील सिंघू सीमारेषा…पण याच ठिकाणी शुक्रवारी एक मृतदेह आढळला आणि एकच खळबळ उडाली. या ठिकाणी एका व्यक्तीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या व्यक्तीचा एक हात दोरखंडांनी बांधला होता, दुसरा हात मनगटापासून कापण्यात आला होता. या घटनेबद्दल तसंच आतापर्यंत नेमक्या काय घडामोडी घडल्या आहेत हे जाणून घेऊयात. (Photo Courtesy: ANI/PTI/Indian Express)
-
या हत्येमागे निहंग शिखांचा गट जबाबदार असल्याचा संशय व्यक्त होता होता. दरम्यान शुक्रवारी संध्याकाळी निहंग सरवजीत सिंग याने पोलिसांकडे आत्मसमर्पण केलं. त्याने या हत्येची जबाबदारी स्वीकारली असून आज कोर्टात हजर केलं जाणार आहे.
-
याआधी हरियाणाचे मुख्यमंत्री खट्टर यांनी कारवाई करण्याचं आश्वासन दिलं होतं. खट्टर यांनी चंदिगडमध्ये बैठक घेतली जिथे गृहमंत्री आणि हरियाणा पोलीस डीजीपी उपस्थित होते. यावेळी हत्येसंबंधी चर्चा करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक पोलीस स्थानकात माहिती देण्यात आल्यानंतर पहाटे पाच वाजता मृतदेह आढळला. पोलिसांना यावेळी पुरावे सापडले होते. तसंच फॉरेन्सिक टीमकडून संपूर्ण परिसराची चाचपणी करण्यात आली होती.
-
पोलिसांच्या माहितीनुसार, हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव लखबीर सिंग असून पंजाबच्या तारतरण जिल्ह्यातील आहे. दलित असणारे लखबीर सिंग मजूर होते. ३५ वर्षीय लखबीर सिंग यांना आई-वडिलांच्या मृत्यूनंतर काकाने दत्तक घेतलं होतं. त्यांच्या मागे पत्नी आणि तीन मुली असा परिवार आहे. सर्वात मोठी मुलगी १२ वर्षाची आणि लहान मुलगी आठ वर्षाची आहे.
-
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लखबीर सिंगभोवती उभ्या राहिलेल्या निहंग गटातील काही व्यक्ती त्याला जाब विचारत असल्याचे व्हिडीओ पोलिसांना मिळाले आहेत. एका व्हिडीओत लखबीर सिंगचा हात कापलेला असून त्यातूर रक्त वाहत असताना लोक तिथे उभे असल्याचं दिसत आहे.
-
यावेळी काही लोकांच्या हातात भाले दिसत आहेत. हे लोक त्याला त्याचं नाव विचारत होते. तर इतर लोक लखबीर सिंगला (मृत आहे की जिवंत स्पष्ट नाही) उलटं लटकवताना दिसत आहेत. तिसऱ्या व्हिडीओत लखबीर सिंग शेवटच्या घटका मोजत असताना काहीजण त्याच व्हिडीओ शूट करताना दिसत आहेत. या व्हिडीओची सत्यता पडताळून पाहिली जात आहे. या व्हिडीओंच्या आधारे ही हत्या निहंग गटाने केल्याचा दावा पोलिसांनी केला.
-
दरम्यान ‘गुरु ग्रंथ साहिब’ची प्रत उचलून पळ काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला आम्ही पकडले. त्याला सिंघू सीमेवर कोणी पाठवले याची विचारणाही केली. त्यानंतर आम्ही त्याचे पाय मोडले आणि हात कापून टाकला. मग त्याला बांधून ठेवले. ज्याने या व्यक्तीला पाठवले त्यालाही आम्ही ठार मारू, असे निहंग गटातील व्यक्ती सांगत असल्याचा व्हिडीओही पोलिसांनी जप्त केला आहे. लखबीर सिंगचा मृतदेह बॅरिकेडला बांधून ठेवण्यात आला होता.
-
‘पंजाबमधील तरणतारण जिल्ह्य़ातील लखबीर सिंग याच्या हत्येची जबाबदारी घटनास्थळावरील निहंग गटाने घेतली आहे. मृत व्यक्ती तसेच निहंग गटाशी संयुक्त किसान मोर्चाचा काहीही संबंध नाही. कोणत्याही धार्मिक ग्रंथाचा अपमान करणे योग्य नाही हीच मोर्चाची भूमिका आहे. पण कोणालाही कायद्याचे उल्लंघन करण्याचा अधिकार नाही. धर्मग्रंथाचा अपमान आणि झालेली हत्या या दोघांमागील षड्यंत्राचा कसून तपास झाला पाहिजे व कटातील दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. यासंदर्भात होणाऱ्या कोणत्याही कायदेशीर चौकशीसाठी पोलीस व स्थानिक प्रशासनाला मोर्चा सहकार्य करेल,’ असे संयुक्त किसान मोर्चाने निवेदनात स्पष्ट केले.
-
मोर्चाच्या सुकाणू समितीचे सदस्य योगेंद्र यादव यांनीही दृक्श्राव्य फीत प्रसिद्ध करून हत्येचा निषेध केला व निहंग गटाचा शेतकरी आंदोलनाशी संबंध नसल्याचे जाहीर केले. हे शेतकऱ्यांचे आंदोलन असून धार्मिक नव्हे, तुम्हाला आंदोलनात स्थान नाही, हे शेतकरी नेत्यांनी निहंग गटाला सातत्याने सांगितले आहे. पण तरीही हा गट सिंघू सीमेवर ठिय्या देऊन बसला आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन आत्तापर्यंत शांततेने झाले असून इथे हिंसेला जागा नाही, असे यादव यांनी नमूद केले. शेतकरी आंदोलनाला धार्मिक बनवण्याचा प्रयत्न केला जात असून ही हत्या कट-कारस्थानाचा भाग असल्याचा संशय मोर्चाचे नेते जगजीत सिंग दल्लेवाल यांनी व्यक्त केला.
-
भाजपाचे अमित मालवीय यांनी यावरुन शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर निशाणा साधत हत्येसाठी जबाबदार धरलं. राकेश टिकैत यांनी उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी येथे झालेल्या दोन पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मृत्यूनंतर जशास तसं उत्तर उल्लेख केला होता. त्याचा संदर्भ देत अमित मालवीय यांनी राकेश टिकैत यांच्यावर टीका केली.
-
मृत लखबीर सिंग कामगार असून त्याचे वडील माजी सैनिक होते. कामानिमित्त लखबीर सिंग जास्त दिवस घऱाबाहेर असायचे असं त्यांची बहिण राज कौर यांनी सांगितलं आहे. “सहा तारखेला लखबीरने माझ्याकडून ५० रुपये घेतले आणि आपण गावापासून दूर १५ किमी अतंरावर असणाऱ्या चबल येथे जात असल्याचं सांगितलं,” अशी माहिती त्यांनी दिली. यानंतर त्यांच्यासोबत कुटुंबाचा संपर्क झाला नाही. शुक्रवारी कुटुंबीयांना त्यांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली.
-
(Photo Courtesy: ANI/PTI/Indian Express)

Anna Hazare : ‘अण्णा आता तरी उठा….’, पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले, “९० वर्षांनंतरही…”