-
जपानमधील एका हत्येच्या खटल्यामध्ये आरोपी असणाऱ्या ८४ वर्षीय इवाओ हाकमाडा या व्यक्तीची नोंद गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. सर्वाधिक काळ फाशीच्या शिक्षेची वाट पाहणारा व्यक्ती (Death row awaiting) म्हणून इवाओचं नाव गिनीज बुकमध्ये नोंदवण्यात आलं आहे.
-
इवाओला दोषी ठरवून जवळजवळ ५० वर्षांपूर्वी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. फाशीची वाट पाहता पाहता इवाओ आता ८४ वर्षांचा झालाय.
-
१९६६ साली इवाओला अटक करण्यात आली होती.
-
या प्रकरणामध्ये अडकण्याआदी इवाओ हा जपानमधील प्रसिद्ध बॉक्सर म्हणून ओळखला जायचा.
-
अटक करण्यात आल्यानंतर जवळजवळ ४८ वर्षांनी म्हणजेच २०१४ साली इवाओला कैदेतून मुक्त करण्यात आलं. मात्र त्याच्यावरील खटला अद्याप सुरुच आहे.
-
१९६६ साली इवाओला चोरी, हिंसा करण्याबरोबरच चार जणांची हत्या केल्याचा आरोप ठेवत अटक करण्यात आलेली.
-
१९६६ साली मध्य जपानमधील शिजूओका येथील राहत्या घरात एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह सापडले होते. मरण पावलेली व्यक्ती ही इवाओचा बॉस होता. इवाओनेच बॉस, बॉसची पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांची हत्या केल्याचा आरोप लावण्यात आला होता.
-
सुरुवातीला इवाओने त्याच्यावरील सर्व गुन्हे मान्य केलं. मात्र खटला सुरु झाल्यानंतर इवाओने सर्व आरोप फेटाळत पोलीस खात्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं.
-
पोलिसांनी आपल्या विरोधात खोटे पुरावे सादर केले. तसेच पोलिसांच्या ताब्यात असतानाच मला मारहाण करुन मी चोरी, हिंसा आणि हत्या केल्याचे माझ्याकडून वदून घेण्यात आल्याचा आरोप इवाओने केला. या प्रकरणामध्ये न्यायालायने इवाओला फाशीची शिक्षा सुनावली.
-
सन २०१४ मध्ये या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळालं. शिजूओका जिल्हा न्यायालयाने या प्रकरणामध्ये दाखल करण्यात आलेली पुनर्विचार याचिका स्वीकारत यासंदर्भात पुन्हा खटला सुरु करण्यास परवानगी दिली.
-
इतकचं नाही तर २०१४ साली इवाओचे वय आणि ढासाळलेली मानसिक परिस्थिती लक्षात घेता त्याला तुरुंगातून मुक्त करण्याचे आदेशही दिले.
-
मात्र चार वर्षानंतर म्हणजेच २०१८ साली टोकीयो उच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिकाचा दावा फेटाळून लावला आणि पुन्हा इवाओला अडचणीत सापडला.
-
इवाओच्या वकिलांनी या प्रकरणामध्ये उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुन्हा सुनावणी करण्यास गुरुवारी मंजुरी दिली.
-
इवाओचे मुख्य वकील किओमी सानुनागो यांनी गुरुवारी पत्रकारांशी चर्चा करताना इवाओला परत अटक करुन मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात येईल अशी आम्हाला भिती होती. मात्र आता उच्च न्यायालयाने सुनावणीस होकार दिल्याने आम्हाला या प्रकरणात न्याय मिळण्याची आशा वाढली आहे असंही सानुनागो म्हणाले. इवाओची बहीण आणि भावाने या प्रकरणामध्ये पोलिसांनी इवाओला अडकवल्याचा आरोप केला आहे. आमच्या भावाकडून जबरदस्तीने गुन्हा वदवून घेण्यात आल्याचं या दोघांचं म्हणणं आहे.
-
इवाओची मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करावी अशी मागणी काही मानवाधिकारासाठी काम करणाऱ्या संस्थांनी केलीय. सोशल नेटवर्किंगवरही #freehakamadanow या हॅशटॅगच्या माध्यमातून इवाओला समर्थन दिलं जात आहे.
-
अमेरिकेमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या कैद्यांना कधी शिक्षा केली जाईल याची तारीख खटला निकाली काढतानाच ठरवतात. जपानमध्ये मात्र मृत्यूदंड अगदी गुप्तपणे दिला जातो. निकाल देताना यामध्ये तारखेचा कोणताही उल्लेख नसतो. त्यामुळेच इवाओला नक्की कधी मृत्यूदंड देण्यात यावा यासंदर्भात मुख्य निकालात कोणताही उल्लेख नव्हता. (फोटो: रॉयटर्स, एएफपी आणि सोशल नेटवर्किंगवरुन आभार)

शेतकऱ्याचा नाद नाय! तब्बल ५ एकरवर बांधलं जबरदस्त शेततळं; VIDEO पाहून थक्क व्हाल एवढं नक्की