संगणक अभियंता मोहसीन शेख खून प्रकरणात हिंदू राष्ट्र सेनेचा धनंजय देसाई याच्यासह २१ जणांची विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले. सबळ पुराव्याअभावी आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
हेही वाचा- पुणे : माथाडी संघटनेच्या नावाखाली खंडणी उकळणाऱ्यांवर कडक कारवाई करणार; पोलीस आयुक्तांचे आदेश
संगणक अभियंता मोहसीन शेख (वय २४) याचा हडपसर भागात २ जून २०१४ रोजी खून झाला होता. समाजमाध्यमात तेढ निर्माण करणारे संदेश प्रसारित झाल्यानंतर शेख याचा खून करण्यात आल्याची घटना घडली होती. शेख मूळचा सोलापूरचा रहिवासी होता. तो एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत काम करत होता. शेख हडपसर भागातून निघाला होता. त्या वेळी त्याने टोपी परिधान केली होती. शेख याच्यावर वार करुन त्याच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. या प्रकरणी संशयावरुन हिंदू राष्ट्र सेनेचा धनंजय देसाई आणि त्याच्या साथीदारांना हडपसर पोलिसांनी अटक केली होती.
हेही वाचा- महाबँकेचे कर्मचारी संपावर, दोन हजारपेक्षा जास्त शाखा बंद; रोखीचे, धनादेश वटवण्याचे व्यवहार थांबले
या प्रकरणात देसाई याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. विशेष न्यायालयाने देसाई याच्यासह २१ साथीदारांची सबळ पुराव्यां अभावी निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले.