पुणे : भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिशा भिसे यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाकडून उपचारासाठी पैशांची अडवणूक केल्याने गर्भवती तनिशा यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. या घटनेची माहिती माध्यमातून समोर आल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाबाबत संतप्त प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर रुग्णालयाच्या पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तर आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पुणे शहरातील ठाकरे गटाचे आणि शिंदे गटाचे पदाधिकारी आमनेसामने येत,रुग्णालय प्रशासनाने विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत कारवाईची मागणी केली. त्या आंदोलनादरम्यान दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडकीकर प्रसार माध्यमांसमोर भूमिका मांडण्यास आले होते. त्यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिरीष याडकीकर यांच्या तोंडावर चिल्लर फेकल्याची घटना घडली.

ही घटना थांबत तोवर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बोर्ड ला पतितपावन संघटनेकडून काळे फासून निषेध नोंदविण्यात आला आहे.त्यानंतर भाजप महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा हर्षदा फरांदे यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात समोर आंदोलन केल्यानंतर, तनिशा भिसे यांच्या कुटुंबियांना उपचारासाठी १० लाख रुपये भरावे लागतील, अशी मागणी करणार्‍या सुश्रुत घैसास यांच्या वडिलांचे अश्विनी नर्सिंग होमची तोडफोड करीत निषेध नोंदविला.

यावेळी डॉ. नीलिमा घैसास म्हणाल्या,सुश्रुत घैसास हा माझा मुलगा आहे. पण त्याचा या रुग्णालयाशी काही संबंध नाही. विनाकारण आमच्या रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली. विनाकारण आमच्या परिवाराला त्रास दिला जात आहे. मी आणि माझे पती तसेच दुसरा मुलगा ४० वर्षापासून रुग्णालय चालवत आहोत, तसेच त्यांने रुग्णालयाच्या नियमानुसार पैसे मागितले असतील, अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dinanath mangeshkar hospital case bjp mahila aghadi vandalizes dr sushrut ghaisas father hospital svk 88 mrj