पुणे : कोकणातील हापूस आंब्यांचा हंगाम बहरला आहे. मार्केट यार्डातील फळबाजारात हापूसची आवक वाढली आहे. हापूसची आवक वाढल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत दरातही घट झाली आहे.येत्या काही दिवसात हापूसची आवक वाढणार असून, दरात आणखी घट होण्याची शक्यता व्यापाऱ्यानी व्यक्त केली आहे. हवामान बदलामुळे यंदा हापूसच्या लागवडीत घट झाली आहे. नेहमीच्या तुलनेत हापूसचे उत्पादन केवळ ६० टक्के झाले असून, हंगाम उशीराने सुरू झाला आहे. गेल्या आठवड्यात कोकणातून तीन ते चार हजार पेट्यांची आवक झाली होती. रविवारी (१३ एप्रिल) कोकणातून सहा ते साडेसहा हजार पेट्यांची आवक झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आवक वाढल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत दरात २५ ते ३० टक्क्यांनी घट झाली आहे. चार ते आठ डझनाच्या पेटीला प्रतवारीनुसार १५०० ते ४५०० रुपये दर मिळाले आहेत. एक डझन तयार हापूसला प्रतवारीनुसार ४०० ते ८०० रुपये दर मिळाले आहेत. हापूसची आवक वाढली असून, दरात घट झाली आहे. यंदा हंगाम लवकर संपणार आहे. दरवर्षी हंगाम साधारणपणे ३० जूनपर्यंत सुरू असतो. यंदा हापूसचा हंगाम जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे, असे मार्केट यार्डातील आंबा व्यापारी युवराज काची यांनी सांगितले.

कर्नाटक आंब्याची आवक वाढली

कर्नाटकातील आंब्यांची आवक वाढली आहे. यंदा वातावरणातील बदलामुळे कर्नाटकातील तुमकूर भागातील आंब्याची लागवड कमी प्रमाणावर झाली. रविवारी बाजारात कर्नाटकातील दोन डझन आंब्यांच्या दहा हजार पेट्यांची आवक झाली. लाकडी पेट्यांची आवक कमी झाली. २० एप्रिलनंतर आवक वाढणार आहे. सध्या तीन ते चार डझन कच्च्या आंब्याच्या पेटीला प्रतवारीनुसार १२०० ते १८०० रुपये दर मिळाले आहेत. एक किलो पायरीला १२० ते १५० रुपये दर मिळाल्याची माहिती कर्नाटक आंब्यांचे व्यापारी रोहन उरसळ यांनी दिली.

हापूसची आवक वाढली असून, रविवारी बाजारात कोकणातून सहा ते साडेसहा हजार पेट्यांची आवक झाली. हंगाम सुरू झाल्यानंतर हापूसची आवक उच्चांकी आहे.- बाळासाहेब कोंडे, विभाग प्रमुख, फळबाजार, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hapus has increased in the fruit market in the market yard pune print news rbk 25 amy