पुणे : सतत मोबाइल आणि लॅपटॉपवर तासन्तास काम करावे लागत असल्याने तरुणांमध्ये बैठी जीवनशैली वाढत आहे. यामुळे त्यांना मणक्याचे विकार जडू लागले आहे. त्यातही त्यांना सर्व्हायकल स्पाँडिलायसिसचा धोका वाढू लागला आहे. बैठी जीवनशैली असलेल्या तरुणांमध्ये मणक्याचे विकार वाढत असल्याने आरोग्यतज्ज्ञांनी नियमित व्यायाम करण्याचा सल्ला दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कार्यालयात संगणक अथवा लॅपटॉपवर काम आणि त्यानंतर सातत्याने मोबाइलचा वापर यामुळे तरुणांमध्ये बैठी जीवनशैली वाढली आहे. बैठ्या जीवनशैलीमुळे शारीरिक हलचालींचा अभाव आणि चुकीच्या पद्धतीने बसणे वा झोपल्याने २० टक्के तरुणांना मणक्याच्या विकाराची समस्या जाणवत आहे. मोबाइल आणि लॅपटॉपमध्ये घालवलेले तास, वाढता स्क्रीन टाइम आणि बसण्याची चुकीची स्थिती ही याची प्रमुख कारणे ठरत आहेत. त्यामुळे तरुणांमध्ये सर्व्हायकल स्पाँडिलायसिस ही समस्याही वाढत आहे. या विकारात पाठीच्या कण्याला सूज येते. हा विकार प्रामुख्याने मानेच्या मणक्याला प्रभावित करतो. ही समस्या मणक्याचा सर्वांत वरचा भाग सर्व्हायकल स्पाईनमध्ये उद्भवत असल्याने तिला सर्व्हायकल स्पॉंडिलायसिस म्हणतात.

याबाबत अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयातील डॉ. मोहित मुथा म्हणाले, की एकाच स्थितीत बसून जास्त वेळ काम केल्यामुळे ३०-४५ वयोगटातील तरुणांमध्ये सर्व्हायकल स्पाँडिलायसिसच्या प्रमाणात सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. चुकीच्या शारीरिक स्थितीत जास्त वेळ बसल्याने पाठीचे स्नायू कमकुवत होतात आणि मणक्याची झीज होऊ लागल्यानंतर मणक्यामध्ये रचनात्मक बदल होऊ लागतात. त्यामुळे तेथील सांध्यांना सूज येणे, स्नायू कडक होणे, शिरा कडक होणे, शिरांवर दाब पडणे अशा समस्या उद्भवतात. योग्य शारीरिक हालचालीशिवाय तासन्तास स्वयंपाकघरात काम करणे, दीर्घकाळ उभे राहणे हेदेखील पाठीच्या कण्यावर ताण निर्माण करू शकते. त्यामुळे वेळीच या समस्येकडे लक्ष देण्याची आवश्यकता असते.

लीलावती रुग्णालयातील डॉ. समीर रुपारेल म्हणाले, की तरुणांमध्ये मणक्याच्या समस्या वाढत आहेत. तरुणांमध्ये कामाच्या ठिकाणी तासन्तास बसून किंवा जास्त वेळ उभे राहिल्याने सर्व्हायकल स्पाँडिलायसिसचा त्रास वाढला आहे. दर महिन्याला मला भेट देणाऱ्या १० पैकी २ ते ३ व्यक्तींना पाठदुखी आणि मानेच्या वेदना सतावतात. त्यांना सर्व्हायकल स्पाँडिलायसिसचा त्रास होतो. दीर्घकालीन मणक्याच्या समस्या टाळण्यासाठी दररोज व्यायाम करणे आणि योग्य पद्धतीने बसणे गरजेचे आहे.

काय उपाय करावेत…

– पाठीचा कणा निरोगी ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करा.

– जास्त वेळ बसून राहणे किंवा उभे राहणे टाळा.

– कामातून थोडा वेळ विश्रांती घेऊन शरीराची हालचाल करा.

– नियमितपणे चालण्याचा सराव ठेवा.

– वजन नियंत्रित राखणे.

– स्वयंपाकघरात जास्त वेळ उभे राहणे टाळा.

– पाठीला योग्य आधार देणाऱ्या खुर्चीचा वापर करा.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health experts warn against working on mobile phones and laptops pune print news stj 05 amy