पुणे : मोबाइलवर संभाषण करत निघालेल्या दुचाकीस्वाराला हटकल्याने त्याने वाहतूक शाखेतील पोलीस हवालदाराच्या डोक्यात दगड घातल्याची धक्कादायक घटना हडपसरमधील फुरसुंगी परिसरात घडली. पसार झालेल्या दुचाकीस्वाराचा शोध घेण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजेश गणपत नाईक (वय ४७) असे जखमी झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. नाईक यांच्यावर रुग्णालयात प्रथोपचार करण्यात आले आहेत. याबाबत नाईक यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार नाईक फुरसुंगी वाहतूक विभागात नियुक्तीस आहेत. गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास फुरसुंगी परिसरातील भेकराईनगर भागात नाईक वाहतूक नियमन करत होते. त्या वेळी दुचाकीस्वार मोबाइलवर संभाषण करत भरधाव वेगाने निघाला होता. नाईक यांनी त्याला समज दिली. त्या वेळी दुचाकीस्वाराने नाईक यांच्याशी वाद घातला. रस्त्यात पडलेला दगड उचलून नाईक यांच्या डोक्यात दगड घालून दुचाकीस्वार पसार झाला. जखमी अवस्थेतील नाईक यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पसार झालेल्या दुचाकीस्वाराचे पोलिसांकडून शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक राजेश खांडे तपास करत आहेत. हडपसर परिसरात पदपथावर लावलेली दुचाकी काढण्यास सांगितल्याने एका महिलेने वाहतूक पोलिसाला चप्पलेने मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली होती.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune youth attack on traffic police pune print news rbk 25 css