पुणे : पुण्यात ७ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक होणार असून, यासाठीचे १७२ करार बुधवारी करण्यात आले. यात ५० लाख ते १ हजार ५०० कोटी रुपयांपर्यंतच्या गुंतवणूक करारांचा समावेश आहे. या गुंतवणुकीमुळे ५० हजार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

औद्योगिक संघटना, सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम, मोठे उद्योजक, बँकर्स यांच्या औद्योगिक गुंतवणूक परिषदेत हे करार करण्यात आले. या वेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे विभागाचे उद्योग सहसंचालक शैलेश राजपूत, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रिज ॲण्ड ॲग्रीकल्चरचे (एमसीसीआयए) महासंचालक प्रशांत गिरबने, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे कार्यकारी संचालक विक्रांत बगाडे, जिल्हा उद्योग केंद्राच्या सरव्यवस्थापिका अर्चना कोठारी आदी उपस्थित होते. याप्रसंगी काही प्रमुख गुंतवणूकदारांचा प्रातिनिधिक स्वरुपात सत्कार करण्यात आला.

या वेळी बोलताना विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार म्हणाले की, पुणे विभागात उद्योगांच्या पायाभूत सुविधांच्या अडचणी, असामाजिक तत्त्वांकडून येणारे अडथळे या अनुषंगाने उद्योगांशी संवाद साधण्यासाठी प्रशासन कायम उपलब्ध असून, दर तीन महिन्यांनी उद्योगांसोबत आढावा घेण्यात येईल.
प्रशांत गिरबने म्हणाले, ‘देशाच्या एकूण निर्यातीत पुणे जिल्हा हा पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये समाविष्ट असून, अभियांत्रिकी निर्यातीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. राज्यात येणाऱ्या परकीय गुंतवणुकीतही पुणे जिल्ह्याचा मोठा वाटा आहे. चेंबर तसेच सदस्य उद्योगांच्या वतीने इलेक्ट्रॉनिक वाहने धोरण तसेच नवीन औद्योगिक धोरणासाठी उपयुक्त सूचना देण्यात येतील. जिल्ह्यात येणाऱ्या गुंतवणूकदारांना विश्वास वाटेल असे वातावरण तयार करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करूया.’

‘समृद्धी’च्या धर्तीवर पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन

जिल्ह्यात विकसित होत असलेला बाह्य वर्तुळाकार मार्ग तसेच अन्य सुविधांमुळे बाह्य क्षेत्रातही उद्योग विकासाला चालना मिळणार आहे. पुरंदर येथील विमानतळाच्या अनुषंगाने अधिसूचना निघताच तत्काळ समृद्धी महामार्ग तसेच पुणे बाह्य वर्तुळाकार मार्गाच्या धर्तीवर जलद भूसंपादन करण्यात येईल. त्याशिवाय पुणे विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाच्या कामालाही लवकरच गती मिळणार आहे. पुणे शहरातील एकात्मिक वाहतूक आराखडा तयार करण्यात आला असून, अशा प्रकारे बाह्य व अंतर्गत वाहतूक कोंडीवर गतीने मार्ग काढण्याच्या उपाययोजना सुरू आहेत, असे विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी सांगितले.

पुढील महिन्यात ॲग्री हॅकॅथॉन

पुढील महिन्यात प्रशासन देशात पहिल्यांदाच नावीन्यपूर्ण अशी पुणे ॲग्री हॅकॅथॉन आयोजित करण्यात येणार असून, यासंदर्भात देशात कृषीमध्ये होत असलेले नवीन संशोधन, अत्याधुनिक तंत्रज्ञान निर्माण करत असलेल्या मोठ्या उद्योगांसोबतच नवकल्पनांच्या माध्यमातून नवउद्यम (स्टार्टअप) स्थापन करणाऱ्यांनाही बोलावण्यात येणार आहे. या सर्वांना त्यांचे तंत्रज्ञान दाखविण्याची संधी मिळणार असून, ते प्रत्यक्ष शेतीपर्यंत कसे जाईल यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

जिल्ह्यामध्ये अधिकाधिक औद्योगिक गुंतवणूक व विकास व्हावा यासाठी उद्योगस्नेही धोरण राबविण्यात येत आहे. उद्योगांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यालाही प्रशासनाचे उच्च प्राधान्य असून, कोणत्याही घटकाकडून त्रास होत असल्यास उद्योगांनी खुलेपणाने, निर्भिडपणे त्याची माहिती द्यावी. – डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, विभागीय आयुक्त

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Investment of rs 7000 crores in pune 50000 youth will get jobs pune print news stj 05 ssb