भाजपा आणि शिवसेनेला सत्तेत येऊन पाच वर्षांचा कालावधी झाला आहे. मात्र या पाच वर्षांत सत्ताधारी भाजपाकडून आघाडीतील काही नेत्यांना सत्तेचा वापर करून अनेक प्रकरणाची चौकशी लावू अशी भीती दाखविली जाते. नोटीसा बजावल्या जात आहेत, यातून भाजपाला सत्तेचा माज आला आहे अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली आहे. पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात अजित पवार बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावेळी अजित पवार म्हणाले की, “आमचं सरकार आल्यावर एकाही खेकडयाने धरण फुटणार नाही किंवा एकाही पोलिसाचे अपहरण होणार नाही. मागील काही महिन्यांमध्ये सत्ताधारी भाजपाच्या मंत्र्याकडून बेताल वक्तव्य केली जात आहेत. हे लक्षात घेता मुंबईतील इमारत दुर्घटनेबाबत भाजपाचे मंत्री ती इमारत घुशीमुळे पडली असे सांगतिल असं वाटलं होतं”.

“मागील पाच वर्ष भाजपा आणि शिवसेना सत्तेमध्ये असूनदेखील शिवसेनेकडून विमा कंपन्यांविरोधात मोर्चा काढण्यात आला. शिवसेना सत्तेमध्ये असताना मोर्चा काढण्याची वेळ त्यांच्यावर आल्याची पाहून वाईट वाटले. शेतकर्‍यांच्या विम्याच्या प्रश्नावर मोर्चा काढायचा होता. तर मुंबईत अधिवेशन काळात विधी मंडळावर का नाही काढला ?”, असा सवाल अजित पवार यांनी यावेळी विचारला.

पुढे ते म्हणाले की, ‘पश्चिम महाराष्ट्रमुक्त राष्ट्रवादी करणार अशी घोषणा भाजपाच्या काही मंत्र्याकडून केली जात आहे. हे लक्षात घेता अशा घोषणा करणार्‍या व्यक्तींना जशाच तसे उत्तर देण्याचे काम करा आणि सर्वांनी एकजुटीने काम करा”.

काही करून विधानसभा निवडणुकीत 145 चा आकडा गाठायचा : अजित पवार
लोकसभा निवडणुकीत राज्यभरात पक्षातील कार्यकर्त्यांनी चांगले काम केले तरी देखील आपल्याला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. हा पराभव लक्षात ठेवून प्रत्येक कार्यकर्त्याने सत्ताधाऱ्यांचा चुकीचा कारभार नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे. यासाठी आपल्याकडे आता साधारण तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुकीत काही झाले तरी 145 चा आकडा गाठयाचा आहे. हा निश्चय आघाडीचा असून त्यादृष्टीने सर्वानी एकजुटीने काम करण्याचा सल्ला अजित पवार यांनी दिला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp ajit pawar on bjp pune sgy