पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी भाजपाचे राहुल जाधव यांची निवड झाल्यानंतर त्याचा आनंद साजरा करताना जाधव समर्थक तसेच भाजपा कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या दणदणाटात सुमारे १०० पोती भंडारा उधळून पालिका मुख्यालयाचा रंग पालटून टाकला होता. त्यातच पाऊस पडल्याने सर्वत्र पिवळा चिखल तयार झाला, त्याचा नागरिकांना त्रास झालाच, वाहने अडकून पडली, काही दुचाकीस्वार घसरूनही पडले होते. माध्यमांत याबाबत वृत्त आल्यानंतर अखेर महापौर जाधव यांनी माफी मागितली आहे. तसेच यापुढील काळात अशा घटना घडणार नाहीत, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शनिवारी पालिका मुख्यालयात महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक होती. आमदार महेश लांडगे यांचे समर्थक राहुल जाधव यांच्या निवडीवर सभागृहात शिक्कामोर्तब झाल्यानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू झाला. सुरुवातीला ढोल ताशांचा दणदणाट सुरू होता. त्यानंतर, भंडारा उधळण्यास सुरुवात झाली. प्रारंभी ५० पोती आणण्यात आली व ती कमी पडल्याचे सांगत आणखी पोती मागवण्यात आली. भंडारा उधळण्यासाठी कार्यकर्ते गाडय़ांच्या टपावर उभे राहिले होते. काही वेळानंतर जेसीबी आणण्यात आला होता. त्यावर बसून कार्यकर्ते भंडाऱ्याची उधळण करत होते. पालिकेत येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर भंडारा टाकला होता. मुख्यालयात लावलेल्या चारचाकी व दुचाकी पिवळ्या रंगाने न्हाऊन निघाल्या. थोडय़ावेळात पाऊस आला. त्यानंतर, सर्वत्र पिवळा चिखल तयार झाला. त्यावरून जाणारी दुचाकी वाहने घसरुन काहींना इजाही झाली. पाण्याचे फवारे मारून रस्ते स्वच्छ करावे लागले. भोसरी पट्टय़ातील कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उन्मादाचे वळण लागल्याने त्यांच्यावर चौफेर टीका झाली होती.

यावर जाधव म्हणाले, मला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौरपद मिळाल्यानंतर माझ्या कार्यकर्त्यानी जो जल्लोष केला. त्यांनी जास्त भंडारा उधळला. आमचे ग्रामदैवत खंडोबा असल्याने भंडाऱ्याला जास्त मान दिला जातो. यात्रेला देखील भंडाऱ्याचा वापर केला जातो. संघर्षातून आल्यानंतर जे यश मिळते, तो आनंद वेगळाच असतो. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला. आजपर्यंत सर्वांनी भंडारा गुलाल उधळलेला आहे. परंतु भंडारा उधळल्यानंतर थोडासा पाऊस आला आणि त्याठिकाणी वाहने घसरले, नागरिक पडले असतील. ज्यांना दुखापत झाली, त्यांची आम्ही दिलगिरी व्यक्त केली आहे. पावसामुळे शहरवासीयांना जो त्रास भोगावा लागला त्या बद्दल हात जोडून दिलगिरी व्यक्त करतो. पुढील काळात अशा घटना घडणार नाहीत, असे त्यांनी माध्यमांसमोर म्हटले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pcmc mayor rahul jadhav apologize for party workers behavior