लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी: महापालिकेच्या करसंकलन विभागाद्वारे नागरिकांना कर भरण्यास प्रवृत्त करण्यासाठी ‘मिम्स’ नंतर ‘रील्स’ स्पर्धेतून आवाहन करण्यात आले. त्याला करदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मोठ्या प्रमाणात मालमत्ता कराचा भरणा केल्याने महापालिका जबाबदार करदात्यांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘तू करदाता, तू करविता’ अभियान राबविणार आहे.

करसंकलन विभागाच्या मालमत्ता कराचा महापालिकेच्या निधीमध्ये महत्त्वाचा वाटा आहे. जागरूक करदात्यांनी प्रामाणिकपणे भरलेल्या कराचा सकारात्मक परिणाम नागरिकांच्या समोर ‘तू करदाता, तू करविता’ अभियानातून मांडला जाणार आहे. चालू आर्थिक वर्षात महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागाने पहिल्या चार महिन्यांतच तब्बल ५०० कोटींचा कर संकलित केला आहे.

आणखी वाचा-पुणे: वरंधा घाट गुरुवारपासून खुला

नागरिकांनी प्रामाणिकपणे भरलेल्या कराचा सामान्य गोरगरीब नागरिकांना कोणत्या प्रकारे लाभ मिळाला, याचा लेखाजोखा करसंकलन विभागाद्वारे जनतेसमोर अभियानाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे. यामध्ये वैद्यकीय सोयी-सुविधा, शैक्षणिक आर्थिक साहाय्य, गरजू नागरिक, अपंग, महिला, बालक यांना मिळणाऱ्या सवलती, अनुदान, मागासवर्गीयांसाठीच्या कल्याणकारी योजनांतून ज्या नागरिकांनी लाभ घेतला आहे, अशा नागरिकांची करदात्यांबद्दल असणारी कृतज्ञता विभागाद्वारे जनतेसमोर मांडण्यात येणार आहे. यासाठी समाज माध्यमे, बातम्या, व्हिडिओज, ऑडियो, फलक अशी विविध साधने वापरण्यात येतील.

कर संवाद, चोवीस तास हेल्पलाइन सारख्या माध्यमातून कर संकलन विभाग नागरिकांशी संवाद साधत आला आहे. नागरिकांविषयी असलेली बांधिलकी वाढवायची असेल तर नवनवीन संवादाचे पूल बांधणे आवश्यक आहे. हे अभियान त्याचाच एक भाग असल्याचे विभागप्रमुख नीलेश देशमुख यांनी सांगितले.

जागरूक नागरिकांनी गतवर्षी व चालू आर्थिक वर्षात आपले कर्तव्य बजावून मालमत्ताकराचा भरणा केला आहे. ‘तू करदाता, तू करविता’ अभियानातून करदात्यांचे आभार मानताना, पालिकेचे कार्य सांगण्याचा व त्यातून सामान्य नागरिकांच्या जीवनमानात झालेला बदल नागरिकांच्या समोर मांडण्यात येणार आहे. सुप्रशासनाचे हे एक महत्त्वाचे अंग आहे. नागरिकांप्रती पालिकेचे असलेले उत्तरदायित्व अधोरेखित करण्याचा हा प्रयत्न आहे. -शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी-चिंचवड महापालिका

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri municipal corporations tu kardata tu karvita campaign pune print news ggy 03 mrj