मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सूचनांना शिक्षकांकडून हरताळ; हजारो शिक्षकांना प्रशिक्षण नाही

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नियमानुसार शिक्षकांकडे शिक्षणशास्त्रातील पदवी किंवा पदविका असणे आवश्यक असूनही पात्रता पूर्ण न करणारे हजारो शिक्षक मुलांना शिकवत आहेत. यामध्ये पुणे विभागांत अशा शिक्षकांची संख्या सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे.

शिक्षकांकडे शिक्षणशास्त्रातील पदवी किंवा पदविका असणे गरजेचे असल्याचा नियम पूर्वीपासूनच आहे. राज्यात प्रशिक्षित शिक्षकच असल्याची माहिती आतापर्यंत शिक्षण विभागाकडून देण्यात येत होती. त्यानंतर शिक्षण हक्क कायदा लागू झाला. या कायद्यानुसारही शिक्षक प्रशिक्षित असणे गरजेचे झाले. मात्र तरीही राज्यात गेली अनेक वर्षे अप्रशिक्षित शिक्षकच शिकवत असल्याचे उघड झाले आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षकांनी शिक्षणशास्त्रातील पदवी किंवा पदविका घेण्याच्या सूचना मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून वारंवार देण्यात आल्या. मात्र त्या शिक्षकांनी टोलावल्या.

आता पुढील तीन वर्षांमध्ये शिक्षणशास्त्रातील पदवी किंवा पदविका घेतली नाही, तर नोकरी गमवावी लागेल असा इशारा दिल्यावर प्रशिक्षणाचे प्रवेशअर्ज भरण्यासाठी शिक्षकांची गर्दी झाली. सध्या पुणे जिल्ह्य़ात सर्वाधिक अप्रशिक्षित शिक्षक असल्याचे समोर आले आहे. शिक्षणशास्त्रातील पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी पुण्यातून सर्वाधिक म्हणजे १ हजार ८२९ अर्ज आले आहेत.

राज्यभरातून ९ हजार ७९८ शिक्षकांनी अर्ज केले आहेत. यामध्ये खासगी शाळांतील शिक्षकांचे प्रमाण अधिक आहे. पन्नास टक्क्य़ांहून अधिक शिक्षक हे खासगी शाळांमधील आहेत. पुण्याखालोखाल ठाणे (९९२), नाशिक (९६८), सातारा (९५३) अर्ज आले आहेत. सर्वात कमी अर्ज सांगली (९) येथून आले आहेत.

शिक्षकांचे प्रमाण जास्त

अप्रिशिक्षित शिक्षकांची आकडेवारी सध्या दहा हजारांच्या जवळपास दिसत असली, तरी प्रत्यक्षात हे प्रमाण जास्त असल्याचे शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. नजीकच्या काळात निवृत्त होणाऱ्या अनेक शिक्षकांनी प्रशिक्षणासाठी अर्ज केलेला नाही. त्याशिवायही अनेक शिक्षकांनी पात्रतेचे निकष पूर्ण करण्यासाठी अर्ज केलेले नाहीत, असे शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune education department has the highest number of untrained teachers