कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या सुरक्षारक्षकांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत सुरक्षा रक्षकांना वेतन दिले जाईल, असा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महापालिकेच्या विविध विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुरक्षारक्षक पुरविण्याचे काम क्रिस्टल या संस्थेला देण्यात आले आहे. या संस्थेने पंधराशे कंत्राटी कामगारांची विविध विभागात नियुक्ती केली आहे. महापालिकेचे दवाखाने, रुग्णालये, उद्यान, वेगवेगळ्या इमारती, कार्यालये यांच्या सुरक्षेचे काम त्यांना देण्यात आले आहे. मात्र सुरक्षारक्षकांना कामगार कायद्याअंतर्गत कोणतेही लाभ मिळत नाहीत, असा आरोप राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी केला आहे. त्याबाबत महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांच्याकडे त्यांनी तक्रार नोंदविली आहे.

कोणतेही कारण न देता वेतन तीन ते चार महिने केले जात नाही. कंत्राटी कामगारांना वेतन चिठ्ठी दिली जात नाही. कारण न देता कामावरून काढून टाकले जाते. याबाबत महापालिका प्रशासनाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र त्याची दखल घेतली जात नाही. या प्रकारामुळे सुरक्षारक्षकांमध्ये नाराजी आहे. सुरक्षारक्षकांचे वेतन वेळेवन न केल्यास आंदोलन करावे लागेल, असे सुनील शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, सुरक्षारक्षकांचे एप्रिल आणि मे महिन्याचे वेतन रखडले असल्याची कबुली महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. एप्रिल महिन्याचे वेतन पुढील दोन दिवसांमध्ये तर, मे महिन्याचे वेतन १० जून पर्यंत दिले जाईल, असे आश्वासन कंपनीकडून देणय़ात आले आहे. कामगार कायद्याचे पालन होत नसल्याच्या आरोपांची सत्यता पडताळण्यात येईल, असे सुरक्षा विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune municipal corporation contract base security guards unpaid for 3 months pune print news scsg