पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळासाठी ३३०० सर्वे क्रमांकातील सुमारे २८३२ हेक्टर जमीन राखीव करण्यात आली आहे. या जमिनीसह रस्ते ,पानंद, ओढा, यासाठी त्याच्या सर्वे क्रमांकासह  वेगळी माहिती देण्यात आली  आहे.  अधिसूचना काढून जागा राखीव करण्यात आली असून लवकरच मोबदला कशा पद्धतीने द्यायचा याबाबतची अंतिम अधिसूचना पुढील काळात जारी होण्याची शक्यता आहे. पुरंदर तालुक्यातील वनपुरी, पारगाव मेमाणे, कुंभार वळण, इखतपूर, उदाची वाडी, मुंजवडी ,खानवडी या गावातील जमिनीचे सर्वे क्रमांक त्याच्या क्षेत्रफळासह औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहेत . महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिनियमानुसार हे क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उद्योग विभागाचे सहसचिव डॉ. श्री. ल. पुलकुंडवार यांनी आज ही अधिसूचना जारी केली, यानुसार विमानतळासाठी अधिनिश्चित केलेल्या गावांना आता औद्योगिक क्षेत्राचा दर्जा देण्यात आला असून त्यामध्ये रस्ते पानंद ओढा यासाठी काही जागा संपादित केली जाणार आहे .या सर्व सात गावाच्या गावाच्या चतु:सीमा निश्चित करण्यात आल्या आहेत .त्या लाल रंगाच्या रेषेने दाखवण्यात आल्याचे अधिसूचनेत म्हणले आहे. आता सात गावातील त्या जमिनीवर एमआयडीसीचे शेरे मारण्यात येतील याबाबत पुरंदर तालुक्यातील सात गावातील  महसूल अधिकारी, एमआयडीसी चे अधिकारी यांची लवकरच बैठक होऊन भूमिका निश्चित होईल ,त्यानंतर या प्रकल्पामध्ये ज्यांच्या जमिनी जात आहेत त्या जागांची वृत्तपत्रात जाहिरात देऊन हरकती व सूचना मागवल्या जातील. महिन्याभरानंतर सात गावांमधील सर्वे नंबरच्या जमिनीवर एमआयडीसी शेरे मारण्यात येईल . जमिनीची मोजणी होऊन त्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली जाईल असे सांगण्यात आले.

पुरंदर हवेलीचे आमदार विजय शिवतरे यांनी विधानसभेमध्ये नुकतेच अर्थसंकल्पावरील भाषण करताना पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी तरतूद करा अशी आग्रही मागणी केली होती. पुरंदरचे विमानतळ हे आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार असून पुण्यासह पश्चिम महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन म्हणून नावारूपाला येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला सांगितले आहे, मात्र अर्थसंकल्पात त्यावर काहीच तरतूद दिसत नाही असे  आमदार विजय शिवतारे यांनी निदर्शनास आणून दिले होते.  अर्थसंकल्पामध्ये पुरंदरला काहीच आर्थिक तरतूद  नसल्याने सर्वत्र नाराजीचे वातावरण होते. परंतु आता विमानतळाच्या बाबतीत वेगाने हालचाली झाल्यामुळे पुरंदरला विमानतळ होणार हे नक्की झाले आहे.अर्थसंकल्प सादर करण्याच्या दिवशीच पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी अधिसूचना काढण्यात आल्याने सरकारने विमानतळाची तयारी पूर्ण केल्याचे दिसत आहे .लवकरच या सात गावातील जमिनीच्या खरेदी विक्रीवर निर्बंध येण्याची शक्यता आहे. .एमआयडीसी ने या जमिनीच्या सातबारावर शिक्के मारल्यानंतर एमआयडीसीच्या परवानगीशिवाय कोणालाही जमिनी बाबत व्यवहार करता येणार नाही असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

पुरंदरच्या प्रस्तावित विमानतळासाठी या  गावातील होणार भूसंपादन

गावाचे नाव.         जमिनीचे क्षेत्र (हेक्टर)

 वनपुरी                    ३३९         

कुंभारवळण.            ३५१ 

उदाची वाडी              २६१      

इखतपूर                    २१७  

मुंजवडी                     १४३    

खानवडी                    ४८४  

पारगाव                   १०३७     

एकूण क्षेत्र.               २८३२

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने पुरंदरच्या प्रस्तावित विमानतळ योजनेस गती मिळाली आहे.,२०२९  पर्यंत पुरंदरचे विमानतळ पूर्ण होईल अशी माहिती देण्यात आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Purandar to get airport 2832 hectares of land in seven villages reserved pune print news amy